मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचे धुमशान

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन

मुंबई : शनिवारी संध्याकाळपासून जोर धरलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरांत रात्रभर धुमशान सुरु होते. मुंबईत जवळपास 180 मिमीहून अधिक पावसाची नोंद पहाटेपर्यंत करण्यात आली असून आता प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आला आहे. आज अत्यावश्यक सेवा आणि कामं वगळता नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन बृहनमुंबई महापालिकेने केले असून खासगी कार्यालये आणि इतर कामकाज बंद ठेवण्यास सांगितले आहे. 

रात्रभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईत अनेक भागांमध्ये 3 फुटांपर्यंत रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्थानकात रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यानं वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे. हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे याच पार्श्‍वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

वडाळा, माझगाव डॉक, भायखळा, दादर, हिंदमाता हे सारे भाग जलमय झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळं अत्यावश्यक सेवांसाठी सुरु असणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. कुर्ला, सायन, दादर या रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यामुळं रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत. पश्‍चिम रेल्वेवर पावसामुळं फारसा खोळंबा झालेला नसला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळं कोलमडलं आहे. गोरेगाव, अंधेरी सबवे याशिवाय अनेक भागांमध्ये पणी साचल्यामुळं बहुतांश मार्गांवरी रस्ते वाहतुकही वळवण्यात आली आहे. त्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडणार्‍या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.