‘कोविड योद्धे बनूया, कोरोनाला हरवूया’

कोविड नियंत्रण लढाईत सामील होण्याचे सिडकाचे आवाहन

नवी मुंबई ः राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोविड-19 नियंत्रणासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन कोरोना विरोधातील या लढाईत सामील होण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. ‘कोविड योद्धे बनूया, कोरोनाला हरवूया’ हे सिडकोतर्फे स्वयंसेवक निवडीसाठी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेचे घोषवाक्य आहे. या मोहिमे अंतर्गत सिडकोला 300 स्वयंसेवकांची तातडीने आवश्यकता असून याकरिता इच्छुक व्यक्तिंनी गुरुवार, 24 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे. 

सिडकोच्या उलवे व करंजाडे नोडमध्ये कोविड-19 साथीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संबंधित नोडमधील प्रत्येक घरास भेटी देऊन आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे; मधुमेह, ह्रदय विकार, किडनी आजार, लठ्ठपणा इ. आजार असणार्‍या व्यक्ती शोधणे व त्यांना आरोग्य शिक्षण देणे, या कामांसाठी  स्वयंसेवकांची तातडीने आवश्यकता आहे. 

स्वयंसेवक होण्यासाठी इच्छुक व्यक्ती किमान 10 वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्वयंसेवकास त्याच्या कामाबद्दल प्रति दिन रू. 500/- मानधन देण्यात येईल. स्वयंसेवकास सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, मास्क, पल्स ऑक्सिजन मीटर, थर्मल मीटर इत्यादी साधने कामाच्या कालावधीत (अंदाजे 15 दिवस) पुरविण्यात येतील. स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असणार्‍या व्यक्तिंनी गुरुवारी सकाळी 11.00 ते सकाळी 11.30 या वेळेत उलवे आरोग्य केंद्र प्लॉट नं. 112, सेक्टर 21, उलवे, नवी मुंबई - 410206 किंवा जिल्हा परिषद शाळा, आर-1 पॉकेट, करंजाडे या पत्त्यावर हजर रहाण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.