एमआयडीसीतील उद्योग समुहांमध्येही कोव्हीड चाचण्या

नवी मुंबई ः‘मिशन बिगीन अगेन’ व्दारे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने एकेका गोष्टीची सुरूवात करण्यात येत असून उद्योग क्षेत्रासही सुरूवात झालेली आहे. विविध ठिकाणांहून येथे कामासाठी ये-जा करणार्‍या कर्मचार्‍यांची कोव्हीड विषयक चाचणी गरजेचे आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेच्यावतीने एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योग समुहांमध्ये जाऊन तेथील कर्मचार्‍यांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हे पूर्वीपासूनच ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टा म्हणून विख्यात असून येथे मोठ्या प्रमाणावर विविध उद्योगांचे जाळे पसरलेले आहे. या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने कर्मचारी येत असून कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करूनच कर्मचारी मर्यादेत उद्योग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तथापि विविध ठिकाणांहून येथे कामासाठी ये-जा करणार्‍या कर्मचार्‍यांची कोव्हीड विषयक चाचणी गरजेचे आहे हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योग समुहांमध्ये जाऊन तेथील कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात येणार आहे. या विशेष मोहीमेअंतर्गत आज एम.आय.डी.सी. च्या महापे येथील क्षेत्रीय कार्यालयापासूनच एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कोव्हीड तपासणीला सुरूवात करण्यात आली असून आज मध्यवर्ती कार्यालयातील तपासणीत 222 अँटिजेन व 4 आर.टी.-पी.सी.आर. तपासणी करण्यात आल्या. यामध्ये 5 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्या लक्षणांनुसार त्यांना योग्य वैद्यकीय सुविधेमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या 20 हून अधिक व्यक्तींची माहिती घेण्यात आलेली असून त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

यापुढील काळात एम.आय.डी.सी. क्षेत्रातील जे उद्योगसमुह आपल्या कर्मचार्‍यांची कोव्हीड 19 चाचणी करू इच्छित असतील त्यांनी आपली नोंदणी एम.आय.डी.सी. नवी मुंबईचे प्रादेशिक अधिकारी सतिश बागल यांचे कार्यालयाकडे करावयाची आहे. त्यांना याबाबतचे ’इन्सिडेन्ट कमांडर’ म्हणून घोषित करण्यात आलेले असून त्यांच्याकडे नोंदीत झालेल्या उद्योगांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास प्राप्त झाल्यानंतर त्या कंपनीत विशेष चाचणी शिबीर घेण्यात येणार आहे. तरी सर्व  उद्योगसमुहांनी याची नोंद घेऊन आपल्या कंपनीतील कर्मचारी वर्गाची कोव्हीड चाचणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.