मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

नवी मुंबई : मंगळवारी संध्याकाळपासून सुरु झालेली पावसाची मुसळधार बुधवारी सकाळपर्यंत सुरुच होती. दोन दिवसांत पडलेल्या पावसाने नवी मुंबईसह पनवेल, उरणचे जनजीवन विस्कळीत झाले. प्रवाशांना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अतिवृष्टीमुळे काहींच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने फार नुकसान झाले आहे. शहरात सर्वाधिक पाऊस नेरुळ विभागात पडला असून, 288.50 मिमी पासवाची नोंद झाली आहे. बेलापूर 278.40 मिमी, वाशी 186.30 मिमी, कोपरखैरणे 182.30 मिमी, ऐरोली 178.80 मिमी पाऊस झाला.

मंगळवारी रात्री व बुधवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका नेरुळ, बेलापुर, कळंबाली, पनवेल परिसरातील नागरिकांना बसला असून त्यांची त्रेधातिरपीट उडाली.  संसतधार सुरु असलेल्या पावसामुळे रस्तेही जलमय झाले होते. त्यातच महामार्गवर वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. कळंबोलीतील केएल 1, केएल 2, केएल 4, एलआयजी, केएल 5 या वसाहतीत सुमारे दोन फुटांपेक्षा अधिक पाणी तुंबले. रस्त्यांना ओढयांचे स्वरूप आले होते. दाराच्या उंबरठयापर्यंत आलेले पाणी रोखण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. लहान मुले व घरातील मौल्यवान साहित्य उंचावर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.  सर्वाधिक सेक्टर 2, 2 ई, सेंट जोसेफ शाळा या परिसरात पाणी तुंबले होते. पनवेल शहरामधील पायोनिअर सोसायटीच्या परिसरात पाणी शिरले होते. पनवेल शीव- पनवेल महामार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी पनवेल शहरात शिरले. सायंकाळी उशिरा तळोजा औद्य्ोगिक वसाहतीमधून अंबरनाथ येथे जाणार्‍या मार्गावर कोंडी असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पनवेल महापालिका हद्दीतील खिडुकपाडा गावातही दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. अनेक घरांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले. येथील लोखंड पोलाद बाजारातील रस्त्याची दुरवस्था झाली असून तीन ते चार फुटांचे खड्डे पडलेले आहेत. पावसाने रस्त्यांना डबक्याचे स्वरूप आले होते. 

बेलापूर सेक्टर 4,5,6 परिसरातील दुकानांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.  नेरुळमध्ये मोठा पाऊस झाला. विविध ठिकाणी पाणी साचले होते. करावे भागातील सखल भाग, करावे भुयारी मार्ग, शिरवणे भुयारी मार्ग, सानपाडा गाव भुयारी मार्ग तसेच शहरातील विविध ठिकाणच्या सखल भागांत पाणी तुंबले होते. नेरुळमधील काही सोसायटयांमध्येही पाणी साचले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ पाण्याचा निचरा करण्यात आला.  

उरण परिसरातील रस्त्यावर दोन ते तीन फुटांचे पाणी साचलेले होते. यामध्ये उरण शहरातही अनेक ठिकाणच्या रस्त्यावर हेच चित्र होते. त्यामुळे  वाहतूक कोंडी झाली होती. उरणमधील कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालय, नवघर ते जेएनपीटी परिसर येथेही पाणी तुंबले होते. उरणमध्ये रात्रभर 123 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  शहरातील कुंभारवाडा, बोरी, मोरा मार्गावरही पाणी तुंबले होते. पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.