विनापरवानगी उपचार करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई

नवी मुंबई : विनापरवानगी कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांवर पालिकेनेे कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीरपणे उपचार सुरु असणार्‍या वाशीतील पामबीच हॉस्पिटलचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द केला आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे तीन स्तरीय रचना तयार करण्यात आली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत. मनपा रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील काही रुग्णालयांमध्ये परवानगी नसतानाही तेथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांकडून उपचारासाठी लाखो रुपये बिल आकारले जात आहे. परवानगी नसताना उपचार करण्यात येणार्‍या रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागणी केली होती. काही रुग्णालयांमध्ये बेकायदेशीरपणे उपचार केले जात असल्याचे पुरावेही दिले होते. आयुक्तांनी या प्रकरणाची छाननी केली असता वाशीतील पामबीच हॉस्पिटलने नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधित रुग्णालयाचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आला आहे.