‘कंगणा’ खनके रे

हजारो वर्षांपासून भारतवर्षाच्या राजकारणात स्त्रीयांना महत्वाचे स्थान आहे. रामायण आणि महाभारतातील युद्धाला निमित्त होते ते स्त्रिशक्तीचे विटंबन. महाभारतात शिखंडीला पुढे करुन पृथ्वीतलावर अपराजित्व आणि अमरत्व घेऊन जन्माला आलेल्या भिष्माचार्यांचा पराभव पांडवांनी केला. यापासून प्रेरणा घेऊन भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणार्‍या व मक्तेदारी   सांगणार्‍या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार पाडण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील यक्ष, किन्नर आणि गंधर्वांचा सहारा घेतल्याचे दिसत आहे. यापैकी एका यक्षिणीने महाराष्ट्र सरकारविरोधात केलेला थयथयाट व रुदन पाहून संपुर्ण भारतवर्षाला ‘कंगणा खनके रे’ चा अनुभव आल्यास नवल वाटावयास नको. 

सुशांतसिंह राजपुताच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेतारका कंगणा रौनावत हिने सुशांत सिंह याने आत्महत्या केली नसून त्याला हिंदी सिनेसृष्टीतील वारसाहक्काचा अन्याय जबाबदार असल्याचे वक्तव्य करुन मुंबई पोलीसांच्या तपासाची सुई संपुर्ण देशावर  आपल्या अभिनयाने अधिपत्य गाजवणार्‍या या क्षेेत्रातील निर्माते, दिग्दर्शक व कलाकार यांच्याकडे जाईल याची काळजी घेतली. हिंदी सिनेसृष्टीवर आपली पकड असावी अशी अपेक्षा सर्वच राजकीय पक्ष करत असतात. अडचणीच्या ठिकाणी प्रसिद्ध नटाला उभे करुन ती जागा जिंकणे किंवा आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी या क्षेत्रातील दिग्गजांना बोलावणे यासाठी प्रत्येक पक्षाला हे क्षेत्र आपल्या दावणीला असावे अशी अपेक्षा असते. या क्षेत्रातील दिग्गज समाजात घडत असलेल्या घटनांबाबत आपले मत व्यक्त करुन समाजाला सतेज करत असतात. सिनेअभिनेत्री दिपीका पदुकोण हिने मध्यंतरी शाहीनबाग आंदोलनात जाऊन आपली उपस्थिती दर्शविल्याने तिला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ट्रोल करण्यात आले होते. अशाचप्रकारच्या भावना विद्यमान सरकारविरोधात अभिनेता आमिर खान, गिरीष कर्नाड, शबाना आझमी, नाना पाटेकर यांनी वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. सिनेतारकांचा समाजावर प्रभाव असल्याने त्यांच्या माध्यमातून सरकारविरोधी उभे राहणार्‍या जनआंदोलनास पाठिंबा मिळू नये यासाठी या क्षेत्राने कोणताही राग आलापने हे सरकारला नुकसानीचे ठरेल या विचारातून ‘कंगणा खनके रे’ चा उद्य झाला काय? अशी शंका उभी ठाकत आहे. सरकार कंगणाला देत असलेल्या संरक्षणावरुन सरकारच्या भुमिकेला पुष्टी मिळत आहे. 

सुशांत सिंह राजपुत याने आत्महत्या केली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याचे भांडवल करत महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी 60 दिवस नुसता तपास करुन गुन्हा दाखल केला नाही म्हणून सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. यात सर्वात मोठा खळखळाट केला तो कंगणा रौनावतने. सुरुवातीला चुकीची मुलाखत देऊन सुशांतची आत्महत्या सिनेसृष्टीतील नेपोटिझममुळे झाली सांगत सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या मुलांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मुंबई पोलीसांचाही तपास त्यामुळे भरकटला जाऊन सुशांत सिंह याला कुठल्या निर्मात्याने त्रास दिला काय याभोवती फिरत राहिला. त्यानंतर कंगणाने दिशा सॅलियन हिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करुन महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याला वाचविण्याचे काम मुंबई पोलीस करत असल्याचे ट्विट करत मुंबई पोलीसांवर आपला विश्‍वास नसल्याचे सांगितले. कंगणाच्या या वक्तव्यानंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. ज्या मुंबईने कंगणाला नाव, शोहरत व पैसा मिळवून दिला त्याच मुंबई बद्दल कंगणाने अपमानकारक वक्तव्य केल्याने अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. प्रसारमाध्यमांची साथ मिळाल्यानंतर कंगणाची अवस्था आधीच मर्कट त्यात मद्यप्याला अशी झाली. मग रोजच कंगणा उवाच ट्विटरवरुन व्यक्त होऊ लागले आणि त्यावर प्रतिक्रियाही उमटू लागल्या. महाराष्ट्र राज्यात अशांतता निर्माण होणे विरोधकांच्या फायद्याचे असल्याने मग भाजपच्या दिग्गज नेत्यांनी कंगणाला मदत करण्यास सुरुवात केली. कंगणाने उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा चालवून तिला सरकारी हिसका दाखवला. त्यावर प्रसारमाध्यमांनी टिकेची झोड महाराष्ट्र सरकारवर उठवून कंगणा ही परराज्यातील नागरिक असल्याने तिच्यावर महाराष्ट्र सरकार अन्याय करत असल्याचे चित्र देशासमोर उभे केले. केंद्र सरकारने कंगणाला ध दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊन ती मुंबईत सुरक्षित येईल आणि मुंबईची शांतता धोक्यात येईल याची व्यवस्था केली. शिवसैनिक मुळात गरम डोक्याचा असल्याने कंगणाच्या आगमनानंतर मुंबईत जाळपोळ, मोठे आंदोलन होईल अशी अपेक्षा असणार्‍या केंद्र सरकारला कात्रजचा घाट उद्धव सरकारने दाखवला. तिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी करुन विरोधकांना अपेक्षित असलेला गोंधळ मुंबईत होऊ दिला नाही. सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे जाऊनही 40 दिवसात मनाजोगे काहीच निष्पन्न होत नसल्याने सीबीआयने तपासाचा मोर्चा अमली पदार्थ सेवनाकडे वळविला. या संधीचे सोने करत कंगणाने संपुर्ण चित्रपटसृष्टीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. अनेक कलाकारांची नावे घेत त्यांची वैद्यकीय चाचणी करावी अशी मागणी केली. महाराष्ट्राची ओळख आणि मुंबईची जान असणार्‍या चित्रपटसृष्टीला कोंडीत पकडण्याची आयती संधी महाराष्ट्रद्वेषींना मिळाली. जी चित्रपटसृष्टी हजारो कोटींची उलाढाल दरवर्षी करते, लाखो लोकांना रोजगार देते अशा उद्योगावर सरसकट गंभीर आरोप केल्याने त्याचे काय परिणाम या क्षेत्रातील कलाकरांवर होतील याची तमा ना सरकारने ना प्रसारमाध्यमांनी ना कंगणाने बाळगली. कंगणाच्या वक्तव्यातून तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत असल्याची जाणीव होत आहे. आज नवीननवीन सिनेतारकांची नावे अमली पदार्थ सेवन करणार्‍यांच्या यादीत येत असून त्यांची चौकशी संबंधित खात्याकडून होत आहे. यामधून मोठी आर्थिक उलाढाल होण्याची चर्चा सध्या सर्व स्तरावर सुरु आहे. 

चित्रपटसृष्टीच नाही तर समाजातील अनेक घटक आज विविध नशेच्या आहारी गेले आहेत. अशा घटकांना पुन्हा जर मुळ प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. देशात नशेचे पदार्थ उपलब्ध होणे व भारतीय समाज त्याच्या आहारी जाणे हे केंद्र सरकारचे अपयश आहे. हे अमली पदार्थ भारताच्या सिमेवरुन निरनिराळ्या मार्गाने देशात येत असून आपण नशेच्या आहारी गेलेल्या लोकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असल्याचे भान आज सरकारसह प्रसारमाध्यमांनासुद्धा नाही याचे दुःख वाटते. आज महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, आरोग्य व्यवस्था आणि कोरोना महामारी यासारखे ज्वलंत प्रश्‍न देशासमोर आ वासून उभे असताना गेले 90 दिवस  प्रसारमाध्यमे फक्त सुशांत आत्महत्या आणि आता सिनेसृष्टीतील अमली पदार्थांचे सेवन यासारख्या कमी महत्वाच्या विषयांवर तासनतास चर्चा करत आहेत. कंगणा रौनावतने आपणही अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबूली प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लगेचच तिची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. महाराष्ट्र सरकारच्या या भुमिकेनंतर कंगणा रौनावतने लागोलाग आपले शिमला येथील घर गाठले असून तिलाही प्रकरणातील गांर्भीयाची जाणीव झाली असेल. त्यामुळे तिच्या नथीतून महाराष्ट्रावर तिर मारणार्‍यांची गोची झाली असून त्यांनी कंगणापासून दूर राहणेच पसंद केल्याने तिचीही अवस्था नुसतीच ‘कंगणा खनके रे’ अशीच झाली आहे. 

-संजयकुमार सुर्वे