अपंग शाळा व प्रशिक्षण केंद्र विशेष शाळा संहितेच्या कक्षेत

आ. मंदाताई म्हात्रे व पृथ्वी पालक संघटनेच्या लढ्याला यश

नवी मुंबई ः महापालिकेच्या अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात (ईटीसी) अपंग शाळा संहितेला बगल देत मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप पृथ्वी पालक संघटना व आमदार मंदा म्हात्रे यांनी केला होता. या आरोपांची दखल राज्यसरकारने घेऊन याबाबत अपंगांसाठी कार्य करणार्‍या सर्व संस्थांना, विशेष शाळांना व प्रशिक्षण केंद्रांना ‘विशेष शाळा संहिता’ लागू करुन एकाच कायद्याखाली आणले आहे. यामुळे शाळा आणि प्रशिक्षण केंद्र यामधील संभ्रम दूर झाल्याने राज्यातील हजारो विशेष मुले व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. 

नवी मुंबई महापालिकेअंतर्गत सुरु असलेल्या ईटीसी केंद्रात दिव्यांगांना अपंग शाळा संहितेअंतर्गत शिक्षण दिले जात नसल्याची तक्रार तेथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पृथ्वी पालक संघटनेेने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती. परंतु मुंढे यांनी ईटीसीवरील विशेष प्रेमाखातर पालक संघटनेच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे पृथ्वी पालक संघटनेने स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन सदर प्रकरणात मदत करण्याची विनंती केली. आ. म्हात्रे यांनी याबाबत तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे पृथ्वी पालक संघटना, विद्यार्थ्यांचे पालक, ईटीसीतील कर्मचारी व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेऊन हा प्रकार नवी मुंबईतच नाही तर राज्यात सर्वच प्रशिक्षण केंद्रात सुरु असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुंढेंनंतर आलेले आयुक्त एन. रामास्वामी यांनीही ईटीसी केंद्राच्या चुका पदराखाली घेत ईटीसी हे शाळा नसून केंद्र असल्याचा पवित्रा मंत्रालयात व मुंबई उच्च न्यायालयातही घेतला. 

राज्यात हजारो विशेष मुले अशाप्रकारच्या प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत असून त्यांना विशेष शाळा संहिते अंतर्गत शिक्षण न दिल्यास शासन विशेष मुलांसाठी करत असलेला खर्च वाया जाईल व अशा मुलांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने होणार नाही याची जाणीव आ. म्हात्रे यांनी राज्यमंत्री व मुख्यमंत्री फडणवीस यांना करुन दिली. महाराष्ट्र शासनाने व्यापक जनहितार्थ दिव्यांगांच्या शिक्षणासाठी व पुनर्वसनासाठी “महाराष्ट्र अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संहिता 2018” हा कायदा अमंलात आणला आहे. या कायद्याअंतर्गत अनुदानित, विना अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र व संलग्न वस्तीगृह, मतिमंद बालगृह, मतिमंदाकरिता कायमस्वरुपी आधारगृह, शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्प इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. 

या कायद्यात अंध, कर्णबधिर, स्वमग्न, अस्थि विकलांग व मतिमंद मुलांना कोणत्या पद्धतीचे शिक्षण द्यावे व त्यांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारच्या अकुशल व्यवसाय व सामाजिक ज्ञान विभागाच्या अंतर्गत येणार्‍या उद्योगांचा समावेश यात केला आहे. त्याचबरोबर या विशेष शाळा आणि प्रशिक्षण केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही संरक्षण या कायद्यात देण्यात आले आहे. त्यामुळे मनमानीपणे प्रशिक्षण केंद्राचे कामकाज करणार्‍या प्रमुखांना चांगलाच चाप सरकारने लावला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विशेष मुले व त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

चौकट

आयुक्तांचे ईटीसीवर विशेष प्रेम

माजी आयुक्त विजय नाहटा यांनी अपंगांच्या शिक्षणासाठी ईटीसीची स्थापना शाळा म्हणून जरी केली तरी या संस्थेला पालिकेच्या शिक्षण विभागाच्या कक्षेत न आणता मुख्याध्यापिका वर्षा भगत यांना संचालक पदी नियुक्ती दिली. आयुक्त दिनेश वाघमारे, तुकाराम मुंढे व एन.रामास्वामी यांच्या कार्यकाळात ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होऊनही कोणतीही ठोस कारवाई न करता सदोदित ईटीसीची विशेष पाठराखण केली. शेवटी शासनानेच कायदा करुन ईटीसीला लगाम लावला. 


कोट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांनी हा कायदा बनवून राज्यातील लाखो विशेष मुलांच्या शिक्षणाचा व पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. या कायद्यामुळे मनमानी करणार्‍या कार्यप्रमुखांच्या वागण्याला आता चाप बसला असून कर्मचार्‍यांनाही कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. ही लढाई लढण्याचे धैर्य दाखवणार्‍या पालक संघटनाही कौतुकास पात्र आहेत. 

- मंदाताई म्हात्रे, आमदार 


कोट

शासनाने राज्यातील विशेष मुलांच्या सर्व प्रशिक्षण केंद्रांना विशेष शाळा संहिता 2018 च्या कक्षेत आणून फार मोठे कार्य केले आहे. यामुळे राज्यातील हजारो विशेष मुलांसह त्यांच्या पालकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या लढ्यात आ. मंदा म्हात्रे यांनी मोठी भुमिका बजावली असून मंत्र्यांसोबत बैठका घेऊन ही सुधारणा करण्यास सरकारला भाग पाडले. आमच्या संघटनेच्यावतीने मंदा म्हात्रे व तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांना मनापासून धन्यवाद.

- शंतनू पाटील, अध्यक्ष, पृथ्वी पालक संघटना