मध्ये रेल्वेची लोकल फेर्‍यात वाढ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी धावत असलेल्या लोकल मध्ये कर्मचार्‍यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोविड 19 च्या नियमांचा भंग होऊन, प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने लोकल फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 355 फेर्‍या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावत होत्या, त्यामध्ये आता 68 फेर्‍यांची वाढ झाली असून, आता 423 फेर्‍या मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे.

नुकतेच  1 सप्टेंबरपासून खासगी कार्यालय कर्मचार्यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरुन 30 टक्के झाली, तर सरकारी कर्मचार्यांचीही उपस्थिती 20 टक्यांवरुन 30 टक्के करण्यात आली. तसेच  राज्य सरकारच्या विनंतीवरून सर्व सहकारी आणि खासगी बँकांच्या कर्मचार्यांना लोकल सेवेत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा ही भंग होताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकल मध्ये अनेक विभागातील अत्यावश्यक कर्मचार्‍यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता, मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरु नयेत, तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर नियम पाळण्यासाठी तब्बल 68 लोकल फेर्या वाढविण्यात आल्या आहे. मध्य रेल्वे मार्गावर दिवसाला एकूण 423 लोकल फेर्‍या धावणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.