वाशीगाव येथील सिग्नल यंत्रणा पूर्ववत करा

नवी मुंबई : नेहमीच वर्दळीच्या असणार्‍या सायन-पनवेल महामार्गावर वाशीगाव येथील सिग्नल यंत्रणा नादुरुस्त असल्याने येथे अनेकदा अपघात घडत आहे. यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे येथील सिग्नल यंत्रणा पुर्ववत करावी अशा मागणीचे निवदेन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहर सहसचिव दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वाहतूक शाखेच्या उपयुक्तांना दिले.

सायन पनवेल हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. याच महामार्गावरून दररोज लाखो वाहनांची वाहतूक होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर वाशीगाव येथे वारंवार अपघात घडत असून या अपघातात अनेकदा लहान मुले, महिला, वयोवृद्धांचा नाहक जीव जात आहे व कित्येकांना गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागत आहे. सायन पनवेल महामार्गावरून शेकडो नागरिक दररोज वाशीगावातून ये-जा करत असतात त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढत आहे, ही गंभीर बाब मनसे शहर सहसचिव दिनेश पाटील यांनी निवेदनाद्वारे वाहतूक शाखेच्या उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली तसेच लवकरात लवकर वाशीगाव येथील सिग्नल यंत्रणा चालू करावी अशी मागणी यावेळी सचिव विलास घोणे यांनी केली. 

सदर ठिकाणी सिग्नल यंत्रणा पूर्ववत केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईलच त्याचप्रमाणे सिग्नल मुळे टप्प्या टप्प्याने वाशी टोलनाक्याकडे वाहने जातील व त्यामुळे वाशी टोलनाक्यावर वाहनांची ट्रॅफिक होणार नाही. त्यामुळे वाशी गाव येथील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी मनसेचे शहर सहसचिव दिनेश पाटील यांनी केली. यावेळी शिष्टमंडळात सचिव विलास घोणे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, आनंद चौगुले,सुरेश मढवी, आदी उपस्थित होते.