पामबीच मार्ग गॅरेजच्या विळख्यात

कोरोना संक्रमणातील व्यस्ततेमुळे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

नवी मुंबई ः शहरातून तातडीने बाहेर जाता यावे म्हणून सिडकोने सीबीडीपासून कोपरखैरणेपर्यंत बांधलेला पामबीच मार्ग पुन्हा एकदा वाशी विभागात गॅरेजच्या विळख्यात अडकल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. पालिकेचा बहुतांश कर्मचारी वर्ग हा कोरोना संक्रमण निवारण्याच्या कामात व्यस्त असल्याने त्याचा फायदा या मार्गावर असलेल्या दुकानदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे. 

सिडकोने 130 कोटी रुपये खर्च करुन सीबीडी ते कोपरखैरणे हा 11 कि.मी चा रस्ता बनवला आहे. सीबीडीमध्ये प्रवेश केलेल्या वाहनाला शहरातून जलद गतीने बाहेर जाता यावे हा उद्देश यामागे होता. रस्त्याच्या मध्यभागी पामची झाडे लावल्याने या रस्त्याला पामबीच महामार्ग असे संबोधण्यात येते. सिडकोने ज्यावेळी या रस्त्याची निर्मिती केली त्यावेळी एकही दुकानाला या रस्त्यालगत परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु शहर नियोजनाचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या हातात आल्यानंतर नियोजनाचा बट्याबोळ पालिकेच्या नगररचना विभागाने केला. या विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे अरेंजा कॉर्नर ते खैरणे या मार्गावर अनेक व्यापार्‍यांनी नवीन गाड्यांचे सुशोभिकरण करण्याच्या सामानाची दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर पालिकेने विकलेल्या भुखंडावर उभे राहिलेल्या सतरा प्लाझा या इमारतीच्या तळभागावर मंजुरी देण्यात आलेल्या दुकानांना या रस्त्यावरुन प्रवेश देण्यात आल्याने रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने थांबवण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीसांवरही त्याचा दबाव वाढला आहे. 

वाहतुक विभागाने नो पार्किंगचा फलक जरी लावला असला तरी फलकासमोरच मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहिलेली पाहायला मिळत आहेत. 

या रस्त्यालगत गाडी सुशोभिकरणाची अनेक दुकाने व्यापार्‍यांनी थाटल्याने येथे गाड्यांची कामे करुन घेण्यासाठी पामबीच मार्गाच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात येत आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वारंवार अपघातही होत आहेत. यापुर्वी पालिकेकडून संंबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असे. परंतु आता कोरोना संक्रमणामुळे कारवाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करण्यात येत आहेत. याबाबत पालिकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता कोरोना संक्रमण निवारण्यात पालिका कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाईस विलंब होत असल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनांवर कारवाई करुन हा रस्ता अडथळामुक्त करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.