आणखी दोन रुग्णालयांवर कारवाई

नवी मुंबई : महापालिका अथवा राज्य शासनाची परवानगी न घेता नियमबाह्यरित्या कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या नवी मुंबई शहरातील आणखी दोन रुग्णालयांवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच पुढील आदेश होईपर्यंत करोना रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घातली आहे. 

महापालिका अथवा राज्य शासनाची परवानगी न घेता नियमबाह्यरित्या शहरातील करोना रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करुन उपचाराचे बिल अव्वाच्या सव्वा लावून रुग्णांची फसवणूक करणाऱया रुग्णालयांचा महापालिका शोध घेत आहे. त्यानुसार  नियमबाह्यरित्या करोना रुग्णांवर उपचार करणाऱया सीबीडी येथील पामबीच हॉस्पिटलवर 15 दिवसांची निलंबनाची कारवाई करणार्‍या महापालिका प्रशासनाने आता ऐरोली सेक्टर-16 येथील क्रिटिकेअर आयसीयू आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व वाशी येथील ग्लोबल 5 हेल्थकेअर (कुन्नुरे रुग्णालय) या रुग्णालयांना परवानगीविना करोना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी प्रत्येक 1 लाख रुपये दंड ठोठावला आहे.  

कारवाई करण्यात आलेल्या या दोन्ही रुग्णालयांना यापूर्वी महापालिकेने नोटीसा बजावून त्यांची म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. परंतु, महापालिकेच्या नोटीसीला विहित वेळेत उत्तर न दिल्याप्रकरणी अखेर आयुक्त अभिजित बांगर यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा या दोन्ही रुग्णालयांवर उगारला आहे. तसेच जोपर्यंत महापालिका परवानगी देत नाही, तोपर्यत करोना रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केली आहे. जे रुग्ण सद्यस्थितीत सदर रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत त्यांच्यावर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करावे व शासन निर्णयानुसार बिल आकारणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.  

दरम्यान, संबंधित रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करावयाचे असल्यास त्यांनी महापालिकेकडे रितसर अर्ज करावा. रुग्णालयीन तपासणीनंतर महापालिका त्याबाबत सदर अर्जावर योग्य तो निर्णय घेईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या धडक कारवाईचा धसका शहरातील लहान-मोठ्या  रुग्णालयांनी घेतला आहे.