...म्हणून भेटले देवेंद्र फडणवीस-संजय राऊत !

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली आहे. सुमारे दोन तास बैठक झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेकडून भेटीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय भूंकपाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीमागचे अनेक तर्क काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच ही भेट झाली होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुलाखत घेण्याचा संजय राऊत यांचा विचार होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’ठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले असल्याचे भाजच्या एका नेत्याने सांगितले.