कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली : मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या नवीन कृषी विधेयकांवरुन आधीच देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यात आता या कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर देशभरात शेतकरी संघटना आणखी आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. आज दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात शेतकर्‍यांनी निदर्शनं केली. यावेळी ट्रॅक्टर जाळण्यात आला. या विधेयकांवरुन पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलनं करत आहेत. सोबतच देशभरात काँग्रेसकडूनही या विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकर्‍यांना कॉर्पोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्टात येईल आणि शेतकर्‍यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.