कोविडबरोबरच मुलभूत सेवांनाही प्राधान्य द्या

आ. गणेश नाईक यांची पालिका प्रशासनाला सुचना

नवी मुंबई ः कोरोना नियंत्रणाची कामे करतानाच पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य इत्यादी मुलभूत सुविधांची कामे देखील प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी सुचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपायांबद्दल नाईक यांनी सोमवारी आयुक्त बांगर यांच्याबरोबर साप्ताहिक आढावा बैठक घेतली. माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. मागील आठवडयात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलापूर, नेरूळ येथील रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन या वर्षी झाली नाही त्यामुळे अशी बिकट स्थिती ओढल्याची बाब माजी आ. संदीप नाईक यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली तर शहराला पुरापासून वाचविणारे होल्डिंग पाँड स्वच्छ न केल्याने रहिवासी विभागात पाणी घुसल्याचे आ. गणेश नाईक म्हणाले. शहरातील सर्वच होल्डिंग पाँड दरवर्षी साफ करावेत. पाऊस बाधितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

एमआयडीसीच्या शटडाऊनमुळे दिघा भागात तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यावर तोडगा म्हणून या भागात पाण्याच्या टाक्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम सुरू करण्यासाठी तातडीने निविदा सुचना काढण्याची मागणी केली. त्याला आयुक्तांनी तात्काळ होकार दर्शवला. या बैठकीस स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ,भाजपा महामंत्री सतिश निकम,माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेवक अमित मेढकर माजी नगरसेवक विनोद म्हात्रे माजी नगरसेवक प्रभाकर भोईर,माजी नगरसेविका शुभांगी पाटील,निशांत भगत,अजय वाळुंज,  प्रभाग समिती सदस्य विजय साळे,राहुल शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑनलाईन शिक्षणासाठी समिती

खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी या शाळांमधून देखील ऑनलाईन शिक्षण सुरू करावे, अशी मागणी माजी आ. संदीप नाईक यांनी आयुक्तांबरोबरच्या मागील बैठकीत केली होती. त्या विषयी त्यांनी आजच्या बैठकीत कार्यवाहीबददल विचारणा केली. जर पालिका शिक्षणाधिकारी, शिक्षण आणि संबधीत शिक्षण विभागातील सर्व घटकांना वेतन देत आहोत तर पालिका शाळांमधील सुमारे 45 हजार विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित का? असा सवाल केला. त्यांवर शिक्षणाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करून लवकरच ऑनलाईन शिक्षण सुरू करेल, अशी ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. या आठवडयातच विद्यार्थ्यांना वहया मिळतील. पोषण आहार सुरू होईल, अशी माहिती दिली. तुर्भे येथे पालिकेच्या माता-बाल रूग्णालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

कोरोना चाचण्या वाढणार

नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा सल्ला आ. नाईक यांनी आयुक्तांना केला असता सध्याच्या दररोजच्या अडीच ते तीन हजार चाचण्यांची संख्या चार हजारांवर नेली जाईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले. पुढील दोन महिने पुरतील एवढा रेमडेसेवीरचा साठा असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. खाजगी रूग्णालयांना देखील रेमडेसेवीरचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली असता तसे निर्देश देवू, असे आयुक्तांनी मान्य केले.