सुशांतच्या शरीरात विष सापडले नाही

एम्सचा अहवाल सीबीआयकडे सुपूर्द

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांत मृत्यूप्रकरणातला आपला ऑटोप्सी आणि व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल सीबीआयच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. या एम्सच्या अहवालात सुशांतच्या व्हिसेरात विषाचे कोणतेही अंश आढळले नसल्याचं म्हटले आहे. 

सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू श्‍वास गुदमरून झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या व्हिसेरा रिपोर्टमधूनही सुशांतच्या शरीरात कोणत्याच प्रकारचं केमिकल किंवा विष सापडलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अशातच सोमवारी रात्री उशीरा एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयडे यासंदर्भाती आपला अहवाल सोपावला आहे. एम्सने दिलेल्या अहवालातून असा दावा करण्यात आला आहे की, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही. एम्सच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा विष आढळून आलेलं नाही. तसेच एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमने कूपर रूग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर प्रश्‍नही उपस्थित केले आहेत. आता सीबीआय एम्सने दिलेल्या या अहवालाच्या आधारे आपल्या तपासाची पुढची दिशा ठरवणार आहे.

कूपर रूग्णालयाच्या अहवालावर प्रश्‍न

रिपोर्टनुसार, एम्सच्याने दिलेल्या अहवालात कूपर रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली नाही. एम्सच्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, कूपर रूग्णालयाने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये टायमिंग दिलेला नाही. कूपर रुग्णालयाकडून सुशांत प्रकरणात निष्काळजीपणा करण्यात आला. कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सने सुशांतची ऑटोप्सी केली. ज्यावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहेत. सुशांतच्या गळ्यावरील निशाणाबाबत रिपोर्टमध्ये काहीच म्हटलेलं नाही.