गोळीबार करणारा खंडणीखोर पत्रकार अटकेत

नवी मुंबई : लॉकडाऊनमध्ये नियम मोडून व्यवसाय करत असल्याची बातमी प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्‍या कथित पत्रकाराला गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे.लाच देण्यास नकार दिल्याने त्याने उजाला डेअरीमध्ये 1 राउंड फायर केला. घटनेची माहिती कळताच न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे. 

आशिष चौधरी हा उलवे न्यूज चॅनलच्या नावाने युट्युबवर बातम्या प्रसारित करीत असतो. उलवे येथील उजाला दूध डेअरीच्या मालकाकडून या आधीही धमकावून आशिष पैसे वसूल करीत होता. रविवारीही (27) आशिषने मालकाला धमकावण्यास सुरुवात केली होती. लॉकडाऊनमध्ये नियमांचे पालन न करता, दूध डेअरीचा व्यवसाय करीत असल्याची उलवे न्यूज युट्युब चॅनलवर बातमी प्रसारित करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन त्याने दोन हजार रुपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, मालकाने मागणी धुडकावून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या आशिषने जवळच असलेल्या पिस्तूलमधून शैलेंद्र कुमार रामशरण यादव (32) यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने नेम चुकल्याने शैलेंद्र बचावले. या प्रकरणी शैलेंद्र यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून आरोपीला पकडल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीसांनी दिली. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्यै कैद झाली असून तो थरार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आशीष चौधरी कोण आहे, त्याच्याकडे पिस्तुल कुठूल आलं, त्याने आधीही काही गुन्हे केलेले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.