मालमत्ता कर भरण्यास मुदतवाढ द्या

मा.नगरसेविका दिव्या गायकवाड यांची आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई ः महापालिकेने नागरिकांना मालमत्ता कराची बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यात 30 सप्टेंबरपर्यंत देयके अदा करण्याचे नमुद केले आहे. मात्र एका आठवड्यात नागरिकांना मालमत्ता कराची बिले भरणे शक्य नसल्याने देयकाचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी मा. नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन  निवेदनाद्वारे केली आहे.  

नवी मुंबई महानगरपालिकेने पाठविलेल्या मालमत्ता कर बिलाच्या देयकाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याकरता वाशीतील प्रभाग क्र. 64 येथील मा. नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पालिकेने नागरिकांना 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीतील मालमत्ता कराची बिले 22 सप्टेंबर 2020 पासून पाठविण्यास सुरुवात केली आहे. तसेच या बिलांमध्ये 30 सप्टेंबर 2020 ही देयक भरण्याची तारीख नमुद करण्यात आली आहे. केवळ एका आठवड्यात नागरिकांना देयकाची रक्कम देणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने 30 डिसेंबरपर्यंत बिलांची देयक भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. तसेच पालिकेकडून बिले वितरीत करणस उशीर झाला आहे, त्यामुळे 30 सप्टेंबरनंतर बिले अदा केलेल्या नागरिकांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये अशी विनंतीही गायकवाड यांनी केली आहे. सेक्टर 14 वाशी प्रभाग कार्यालय वगळता मालमत्ता कराचे बिल भरण्यासाठी वाशीमध्ये एकही खिडकी नाही. त्यामुळे सेक्टर 1,2 आणि 6,7 8 येथे वाशी मधील मालमत्ता कर बिल संकलन केंद्र सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. सोसायटी मालमत्ता कराची भरपाई बँकांमार्फत केली जाते परंतु नवी मुंबई महानगरपालिका कर बिलांच्या नोंदीमध्ये हे दिसून येत नाही आणि बिलात जुनी थकबाकी जमा केली जात आहे व ती सोसायटीला पाठविली जातात. वारंवार विनंती करूनही या चुका एनएमएमसीद्वारे सुधारल्या जात नसल्याचे निदर्शनास आणून यात दुरुस्ती करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच शक्य असल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) अंतर्गत येणार्‍या नागरिकांना मालमत्ता कराची  6 महिन्यांची बिले माफ करण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.