सिडकोच्या नोटीसीला केराची टोपली

घणसोलीत विनापरवानगी अनधिकृत बांधकाम  

नवी मुंबई ः कोरोनामुळे सर्व यंत्रणा आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये व्यस्त आहेत. याचा फायदा घेत शहरात विविध विभागात अनधिकृत कामांनी वेग घेतला आहे. कुठे पदपथांवर आक्रमण, कुठे नो पार्किंगमध्ये पार्किंग तर कुठे बेकायदा बांधकाम करणार्‍या माफियांनी डोके वर काढले आहे. सिडकोने नोटीस बजावून देखील घणसोलीतील गणेश नगरमध्ये सहा महिन्यात 4 मजली इमारत बांधकाम व्यावसायिकाने उभारली आहे. त्यामुळे संबंधित प्राधिकरणाने अनधिकृत बांधकामावर योग्य ती कारवाई करुन भविष्यात सर्वसामान्यांची होणारी फसवणुक थांबवावी अशी मागणी जोर धरुन लागली आहे. 

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी महापालिका, सिडको ही प्राधिकरणे नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात व्यस्त झाली आहेत. त्यामुळे या प्राधिकरणातील वेगवेगळ्या विभागातील कामाकाजावरही त्याचा परिणाम होत आहे. याचा गैरफायदा घेत शहरातील भुमाफियांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे. घणसोली गावातील गणेश नगर मध्ये माथाडी चाळी समोर नव्याने 6 महिन्यातच नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सदर बांधकाम संबंधित बांधकाम व्यावसायिकाने सिडकोच्या परवानगीशिवाय केले आहे. याप्रकरणी सिडकोने संबंधित व्यावसायिकाला नोटिस पाठवून हे बांधकाम तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये हे बांधकाम अनधिकृत असून प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीप्रमाणे बांधकाम नसून बिल्डरला दिलेल्या 1वर्षाच्या विकास परवानगची मुदतही संपलेली असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम थांबवून जमिन ज्या स्थितीत होती त्या स्थितीत आणून ठेवण्याचे  नोटीसीत नमुद केले आहे. तसेच नोटिसीची दखल न घेतल्यास सदर अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगरनियोजन कायदा 1966 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असेही नमुद केले आहे. मात्र सिडकोच्या नोटीसीला केराची टोपली दाखवून सबंधित व्यावसायिकाने इमारतीचे बाहेरुन प्लास्टर व रंगकाम करुन इमारत पुर्ण करुन घेतली.  त्यामुळे संबंधित विकासकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जेणेकरुन येथे घर घेणार्‍या सर्वसामान्यांची फसवणुक न होता इतर अनधिकृत बांधकामांना लगाम लागेल.