सीबीडीमध्ये स्वच्छतागृह व ओपन जिमचे लोकार्पण

आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली आमदार निधीची तरतूद

नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बेलापूर सीबीडी गुरुद्वारा येथील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह तसेच ओपन जिमचा लोकार्पण सोहळा गुरुद्वारातील ज्येष्ठ नागरिक नरेंद्र गिल, गुरसेब सिंग व अमरजित कौर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. 

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान तसेच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत माझ्या बेलापूर विधानसभा क्षेत्रात प्रत्येक प्रभागात सुसज्ज अशी अनेक स्वच्छता गृहे उभारली आहेत. स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूर्वक बाबी असून स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान माझ्या बेलापूर मतदारसंघात राबविण्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सीबीडी गुरुद्वारा हे सीबीडी बेलापूर मधील सर्वात जुने व पहिले गुरुद्वारा असून त्यांच्या माध्यमातून अनेक धार्मिक, सामाजिक, लोकोपयोगी कार्यक्रम राबवून लोकांची सेवा करण्याचे काम केले जाते. सीबीडी गुरुद्वारा येथे सुसज्ज असे स्वच्छता गृह तसेच ओपन जिम व्हावे अशी स्थानिकांची मागणी होती. त्यानुसार मी सुसज्ज स्वच्छता गृह व ओपन जिम करिता आमदार निधीची तरतूद केली होती. सध्या स्वच्छता गृह व ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले असून सार्वजनिक स्नान गृह, आराम गृह तसेच खास महिलांकरिता सुसज्ज बस स्वच्छता गृह उभारण्याकरिता असा एकूण सुमारे रु. 50 लाख निधीचे काम करून देणार आहे. त्यांना हव्या असलेल्या प्रत्येक सुविधा त्यांना प्राप्त करून देणार असून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य असल्याचे आ.म्हात्रे यांनी सांगितले. तसेच ओपन जिमची ही नागरिकांना आवश्यकता असून प्रत्येक वयातील नागरिक आपल्या फिटनेससाठी ओपन जिमकडे वळू लागली आहेत. या कोरोना काळात नागरिकांनी ओपन जिम बरोबरच योग साधना करण्याचे आवाहनही आ. मंदा म्हात्रे यांनी केले आहे.