नियमांचे उल्लंघन केल्यास बाजार बंदचा इशारा

पालिका आयुक्तांकडून एपीएमसीची पाहणी 

नवी मुंबई : नवी मुंबईमधील कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश आहे. भरारी पथके नेमल्यानंतरही एपीएमसी बाजार आवारात नियमांचे पालन होत नसल्याने बुधवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: एपीएमसीची अचानक पाहणी केली. नियमांचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश देत बेशिस्तीला आळा न आल्यास बाजार बंदचाही इशारा दिला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचही बाजार ही गर्दीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळून व्यापार करावा अशी अट घालण्यात आली आहे. मात्र या नियमाला या ठिकाणी हरताळ फासला जात आहे. सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने या बाजारात पुन्हा गर्दी वाढली आहे. याची दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एपीएमसीवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी बेशिस्तीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांद्वारा कारवाई सुरू केली आहे. तरीही एपीएमसीत नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आयुक्तांनी बुधवारी एपीएमसीतील बाजार आवारांना भेट देत पाहणी केली. कांदा-बटाटा मार्केट, भाजीपाला व फळ मार्केटमधील विविध विंगमध्ये फेरफटका मारून तेथील वस्तुस्थितीची माहिती घेतली.बाजार समितीमध्ये काही कामगार व इतर घटक मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आर्थिक क्षमता नाही अशा कामगारांकडून दंड वसूल करण्यापूर्वी त्यांना मास्क देण्याच्या एपीएमसी प्रशासनाला सूचना केल्या. तसेच बाजारात केवळ अधिकृत व्यापाराला परवानगी द्यावी. किरकोळ व्यापार अधिकृत नाही, त्यामुळे त्याला परवानगी नाही, असेही त्यांनी सांगितले. पालिकेतर्फे भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्याकडून नियम न पाळाणार्‍यांना दंड आकारला जाईल. दंड वसूल करूनही कोणी ऐकत नसेल तर त्याचा गाळा, व्यवसाय बंद करण्याच्या सूचना त्यांनी एपीएमसी प्रशासनाला दिल्या आहेत. या वेळी एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, मनपाचे उपआयुक्त दादासाहेब चाबूकस्वार आदी अधिकारी उपस्थित होते.