राहुल गांधी यांना अटक

नवी दिल्ली : हाथरसमधील घटनेने देशात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पायी चालत निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधी यांना अटक केली.

हाथरस मुद्द्यावरुन राजकारणातही बरीच वादळं येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्या रोखानं त्यांनी प्रवासही सुरु केला. पण, त्यापूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई करत राहुल आणि प्रियंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती. 

तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली.