उद्यान विभागावर चौकशीचा नांगर

8 कोटींचा भ्रष्टाचार ः आ.मंदा म्हात्रे यांचा आरोप 

नवी मुंबई ः आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिकेच्या उद्यान विभागात 8 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप पालिका प्रशासनावर केला होता. याची दखल पालिका आयुक्तांनी घेऊन ठेकेदाराचे काम व त्याला अदा केलेल्या देयकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. चौकशीच्या नांगरणीतून भ्रष्टाचाराचे मुळे बाहेर येतील अशी अपेक्षा आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.            

महापालिकेने शहरातील 248 उद्यानांची कामे दोन ठेकेदारांमध्ये गेल्या मार्चमध्ये वाटून दिली होती. 22 मार्चपासून जूनपर्यंत देशात लॉकडाऊन असूनही ठेकेदाराला 8 कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले. या देयकाबाबत बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्षेप घेत लॉकडाऊन असताना खोटे बिल अदा केले असल्याचा आरोप पालिका प्रशासनावर लावला.त्यांनी याबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांना लेखी निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन ठेकेदाराचे काम व त्याला अदा करण्यात आलेले देयक याची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. 

आ. म्हात्रे यांनी आयुक्तांच्या भुमिकेचे स्वागत केले असून चौकशीच्या नांगरणीतून भ्रष्टाचाराची पाळेमुळे चौकशी समितीकडून खणून काढली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आयुक्तांच्या या भुमिकेमुळे उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले असून आ. म्हात्रे यांनी तक्रार मागे घ्यावी म्हणून त्यांचा उंबरठा झिजवला जात आहे. 

चौकट

भाजपा हायकमांडकडे आ.मंदा म्हात्रेंविरुद्ध तक्रार

1  नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असताना आ. म्हात्रे यांनी उद्यान विभागातील तथाकथित भ्रष्टाचाराबाबत तक्रार करुन जनमानसात पक्षाची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार भाजप हायकमांडकडे केल्याचे भाजपचे नवी मुंबईतील वरिष्ठ नेत्याने आजची नवी मुंबईला सांगितले. 

2  नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक तोंडावर असून असल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे भाजपला त्याचा फटका बसू शकतो अशी तक्रारही संबंधितांनी केली आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराचे संबंध गुजरातशी असल्याने मंदाताईंच्या विरोधकांना त्यांच्याविरुद्ध कान फुंकण्याची आयती संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.