सफाई शहराची की तिजोरीची?

पाच वर्षांसाठी 110 कोटींच्या नवीन निविदा प्रक्रियेला सुरुवात 

नवी मुंबई ः पालिकेच्या 9 विभागातील दैनंदिन साफसफाईच्या 110 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया पालिकेने सुरु केली असून गुरुवारी या संदर्भात ईच्छुक ठेकेदारांची बैठक उपायुक्त आबासाहेब राजळे यांच्या सोबत पार पडली. या कामांबरोबर शेकडो कोटी रुपये पालिका कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी खर्च करत असल्याने शहराची सफाई की पालिकेच्या तिजोरीची सफाई ? असा प्रश्‍न करदात्या नागरिकांना पडला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे 91 ठेकेदारासह सूमारे चार हजार कामगारांमार्फत 9 प्रभांगामध्ये दैनंदिन साफसफाई करण्यात येते. या कामावर पालिकेकडून 80 कोटी रुपये गेल्या पाच वर्षांत खर्च करण्यात आले. ही सफाई दररोज दोन वेळा करण्यात येत असल्याचे फलक जरी नवी मुंबईतील प्रत्येक सेक्टरमध्ये पालिकेने लावले असले तरी सफाई मात्र एकदाच करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सफाई कर्मचारी व ठेकेदार दुपारनंतर गायब होत असल्याने मध्यंतरी 11 कोटी रुपये खर्च करुन सफाई कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट वॉच खरेदी केले. परंतु, ही खरेदी व्यर्थ गेल्याची चर्चा पालिकेत आहे.  

यापुर्वी पालिका प्रशासनाने ही कामे एकत्रितपणे दोन विभागात करण्याचा प्रयोग यापुर्वी केला होता. परिमंडळ 1 व 2 मध्ये दोन ठेकेदारांना या कामांचे व्यवस्थापन देऊन कर्मचार्‍यांना त्यांच्या हाताखाली काम करण्याचा मानस प्रशासनाचा होता. यावेळी उद्यान विभागामार्फत हा प्रयोग करण्यात आला असून स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना उद्यान विभागातून दूर ठेवण्यात आले आहे. हे काम बाहेरील ठेकेदारांना देण्यात आले आहे. परंतू साफसफाई विभागात मात्र स्थानिक नेते गणेश नाईक यांच्या निर्णायक भुमिकेमुळे प्रशासनाला ही कामे स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडून करुन घ्यावी लागणार आहेत. 

दरम्यान, या कामांचे कंत्राट संपले असून नव्याने निविदा प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरु केली आहे. 91 ठेकेदारांचे काम यावेळी 96 ठेकेदारांमध्ये वाटण्यात येणार असून ही कामे स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना मिळावी म्हणून पालिका प्रशासन व स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. पुढील पाच वर्षात या कामावर 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याकामांमध्ये शहरातील सर्व रस्त्यांच्या साफसफाईचा समावेश असून दोन फुट रुंद  असणार्‍या पावसाळी गटारांच्या सफाईचाही समावेश आहे. वर्षातून दोनवेळा ठेकेदारांना पावसाळी गटारे साफ करायची असून त्यातून निघणारी घाण त्यांना डम्पिंग ग्राऊंडपर्यत वाहून नेणे बंधनकारक आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये मुंबई आणि ठाणे महापालिकेत काम करणार्‍या काही ठेकेदारांनी निविदा खरेदी केल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत असून त्यांना निविदा भरण्यामध्ये आडकाठी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतची निविदापुर्व बैठक उपायुक्त आबासाहेब राजळे यांनी गुरुवारी बोलवली होती. त्या बैठकीत सारे प्रकल्पग्रस्त ठेकेदार हजर होते. यावेळी त्यांनी सर्वांनी कामे वाटून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून कळत असून या निविदा प्रक्रियेचे सुत्रसंचालन पालिकेत यापुर्वी महत्वाचे पद भुषवणार्‍या राजकीय नायकाकडून होत असल्याचे बोलले जात आहे. ही कामे वर्षानुवर्ष तेचतेच स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार करत असून त्यांनी शहराच्या  सफाईबरोबर पालिकेच्या तिजोरीच्या स्वास्थाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा नवी मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. 


चौकट

मॅकॅनिकल स्विपिंग

नवी मुंबई महानगर पालिकेने ठाणे-बेलापूर रस्ता व पामबीच महामार्ग सफाईसाठी 72 कोटी रुपये गेल्या सात वर्षात खर्च केले आहेत. या गाड्या साफसफाई न करता नुसतीच धुळ नागरिकांच्या डोळ्यात फेकत असल्याचे बोलले जात आहे. 

कचरा वाहतूक 

शहरातील ओला व सुका कचरा वाहतुकीसाठी पालिकेमार्फत 360 कोटी रुपयांचे पाच वर्षांचे कंत्राट ठेकेदाराला देण्यात आले आहे. दररोज सुमारे 750 मेट्रिक टन कचरा ठेकेदाराकडून शहरातून डम्पिंग ग्राऊंडकडे नेण्यात येते. 

ओला- सुका कचरा विल्हेवाट

शहरातून जमा केलेला ओला व सुका कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून 80 कोटी रुपयांचे कंत्राट ठेकेदाराला देण्यात आले असून पुन्हा कचर्‍याचा सेल भरल्यानंतर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात.