एमआयडीसी क्षेत्रात 2 टेस्टींग केंद्रेही कार्यान्वित

नवी मुंबई ः कोरोना प्रसाराच्या दृष्टीने एम.आय.डी.सी. क्षेत्र हे जोखमीचे क्षेत्र असल्याने 28 सप्टेंबरपासून एमआयडीसीच्या नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयापासूनच विशेष कोव्हीड तपासणी शिबिरे राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याशिवाय अधिकची सुविधा म्हणून ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असो. (टीबीआयए) आणि टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रिज असो. (टीएमआयए) यांच्या रबाले येथील कार्यालयांमध्ये स्वतंत्र कोव्हीड 19 टेस्टींग सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत. 

5 ऑक्टोबर पर्यंत झायडस, लुब्रिझॉल, मिलिनियम बिझनेस पार्क, माझदा कलर्स, अमाइन्स अँड प्लास्टिसायझर्स लि., नेरोलॅर पेन्ट्स, अपार इंटस्ट्रिज, पार्कर, इग्लू अशा विविध 13 कंपन्यामध्ये टेस्टिंग शिबिरे राबविण्यात आली असून 1333 कर्मचा-यांचे टेस्टींग करण्यात आलेले आहे. त्यामधील 35 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या लक्षणांनुसार त्यांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील किमान 24 निकटवर्तीयांचीही तपासणी करण्यात आलेली आहे. एमआयडीसी कार्यालयांमार्फत कंपन्यांमधील तपासण्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून त्यानुसार महानगरपालिकेची तपासणी पथके विविध कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. याकरिता मोबाईल टेस्टींग व्हॅनही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दोन महत्वाच्या संस्था ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असो. (टीबीआयए ) आणि टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रिज असो. (टीएमआयए) यांच्या रबाले येथील कार्यालयांमध्ये स्वतंत्र कोव्हीड 19 टेस्टींग सेंटर आजपासून सुरू करण्यात आलेली आहेत. या दोन्ही ठिकाणी अँटिजेन व आटी-पीसीआर अशा दोन्ही टेस्ट केल्या जाणार आहेत. कमीत कमी वेळेत व सुलभपणे टेस्टींग व्हावे याकरिता ही एका ठिकाणी स्थायिक दोन केंद्रे स्थापन करण्यात आली असून याठिकाणीही कंपन्यांमधील कामगार येऊन टेस्टींग करण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.

विशेष कोव्हीड तपासणी शिबिर

वाशी रेल्वे स्टेशन आणि इनॉर्बिट मॉलच्या कर्मचार्‍यांसाठी विशेष कोव्हीड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.वाशी रेल्वे स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता व इतर काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. यामध्ये 376 कर्मचा-यांची अँटिजेन टेस्टींग तसेच 29 जणांची आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात आली. टिजेन टेस्टींगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 2 कोरोना बाधितांना लगेच विलगीकरण करण्यात आलेले आहे व त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आलेली आहे. अशाचप्रकारे वाशी येथील इनॉर्बिट मॉलमधील 202 अधिकारी, कर्मचारी यांची आँटिजन टेस्टींग करण्यात आली.