पालिकेला सहाव्यांदा ‘डबल ए प्लस स्टेबल’ पत मानांकन

नवी मुंबई ः इंडिया रेटींग अँड रिसर्च (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस इंडिया डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन सन 2019-20 करीता जाहीर झाले आहे. अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने सहाव्या वर्षी मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.

देशातील निवासयोग्य शहरांमध्ये देशातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांसाठी पुरविण्यात येणार्‍या सेवासुविधांच्या दर्जाकडे ज्याप्रमाणे बारकाईने लक्ष दिले जाते त्याचप्रमाणे महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही नेहमीच काटेकोर लक्ष दिले जाते. त्यामुळेच सर्व बाबींचा समतोल राखला जात असल्याने अशाप्रकारचे आर्थिक पत मानांकन सातत्याने मिळत असून ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मागील आर्थिक वर्षात कोव्हीड 19 चा प्रभाव सुरू झालेला असताना व मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अंतिम कालावधीत पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर झालेला असतानाही कर वसूलीची उत्तम कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम झालेली आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त करणार्‍या देशातील 4 शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई हे एकमेव शहर ठरले तसेच ’स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ’स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये राज्यात सर्वप्रथम व देशात तिसर्‍या क्रमांकाचा बहुमान नवी मुंबईस प्राप्त झाला. निवासयोग्य शहरांमध्येही देशातील व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई मान्यताप्राप्त ठरले.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी आपल्या सहकार्‍यांसह महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले आहे. करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि योग्य बाबींवरच खर्च करण्याचे काटकसरीचे धोरण हा प्रमुख भाग आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ या अभिनव प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली असून पेपरलेस व गतीमान प्रशासन प्रभावीपणे राबविले जात आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही थकीत कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही.