दोघा सराईत गुन्हेगार गजाआड

5 लाख 62 हजार किंमतीचे दागिने हस्तगत

नवी मुंबई ः पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटुन 5,62,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. ही घरफोडी चोरी करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी गजाआड केले आहे.

शिरढोणपाडा या गावात राहणार्‍या एका महिलेच्या बंद घराचा कडी कोंयडा तोडून चोरांनी 5 लाख 62 हजार किंमतीचे दागिने चोरुन नेले होते. सदर घरफोडीचा पोलीसांनी बारकाईने अभ्यास केला असता यातील आरोपीत हे याच परीसरातील असावेत त्या अनुषंगाने तपास सुरू केला. सदर पथकाने गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार याच भागात आरोपींवर पाळत ठेवुन एका आरोपीस पळस्पे फाटा येथून अटक केली. गुन्हयाबाबत कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अनिल नाईक, वय 35 वर्ष रा.गिरवले गाव, ता.पनवेल असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार राजेश वाजेकर, वय 38 वर्ष , रा.शिरढोणपाडा, ता.पनवेल याचे मदतीने केला असल्याचे सांगितले. आरोपी राजेश नारायण वाजेकर याला शिरढोणपाडा येथुन शिताफीने ताब्यात घेवुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींकडून गुन्हयातील 5,14,000 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि सुनिल तारमळे हे करीत आहेत.