आरक्षण मिळेपर्यंत एममीएससी परीक्षा घेऊ नये

मराठा समाजाची बैठक ; संभाजीराजेंची मागणी

नवी मुंबई ः मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी केली आहे. मराठा आरक्षणासह विविध विषयांबाबत नवी मुंबई येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे भोसलेही उपस्थित राहणार होते. या बैठकीस संभाजीराजेंनी हजेरी लावली होती. मात्र, उदयनराजे उपस्थित नव्हते. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा,महाराष्ट्र राज्य व विविध संघटनांच्या प्रमुखांची राज्यस्तरीय बैठक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगार युनियनचे कार्यालय, माथाडी भवन ,तुर्भे,नवी मुंबई याठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले व  छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत, येत्या 22 नोव्हेंबरला होणार्‍या एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसे झाल्यास पुढील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असेल, असा इशाराही त्यांनी दिला. संभाजीराजे यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केले. आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजासोबतच खाली बसणार, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. यानंतर संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायचा असतो, त्यावेळी पुढार्‍यांकडून आम्ही तो बरोबर घेतो. माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको, असे संभाजीराजे यांनी म्हटले. छत्रपती शाहू महाराज सुद्धा समाजाच्या कार्यक्रमात गेले की, समाजाचा घटक म्हणून वावरत होते. त्याप्रमाणे मला वावरू द्या, असेही ते म्हणाले. या बैठकीस गर्दी झाल्याने सोशल डिस्टंन्सिंग फज्जा उडालेला पहायला मिळाला.