विभागनिहाय कामांची जबाबदारी सहव्यवस्थापकांकडे

अंतिम निर्णय व्यवस्थापकीय संचालकच घेणार

नवी मुंबई : सिडकोच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी यासाठी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या अधिनस्त तीन सह-व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य दक्षता अधिकारी यांच्याकडे विभाग निहाय कामांची जबाबदारी सोपवली आहे. यासंदर्भात डॉ. संजय मुखर्जी यांनी कार्यालयीन सुविधेसाठी केलेल्या या खातेवाटपानंतर सिडकोच्या कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घेतलेल्या निर्णयानुसार सह-व्यवस्थापकीय संचालक-1 अश्‍विन मुदगल यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेसह गृहनिर्माण प्रकल्प, मार्केटींग-1/2, नैना प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अंतर्गत अनधिकृत बांधकाम नियंत्रक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अंतर्गत भूसंपादन आणि पुनर्वसन, महाव्यवस्थापक (पर्यावरण), डेटा सेंटर आणि सिस्टीम डिपार्टमेंट, नवी मुंबई मेट्रो प्रकल्प, पर्सनल तसेच जबाबदारी दिलेल्या विभागांतर्गत प्रलंबित धोरण, कायदेमंडळात वादविवादात उपस्थित होणारे प्रश्‍न याबाबत पाठपुरावा करणे, अशा विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सह-व्यवस्थापकीय संचालक-2 एस. एस. पाटील यांच्याकडे शहर सेवा व्यवस्थापक (1,2,3), नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम विरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक, नवी मुंबई एसईझेड, हर्बन हाट, गरजेपोटी, सह-निबंधक (गृहनिर्माण सोसायटी), रोहा आणि पुरंदर विमानतळ नवीन टाऊनशिप विकास प्रकल्पासाठी जमीन संपादन, सिडको मुख्यालय अंतर्गत मुख्य प्रशासक (नवीन शहर) औरंगाबाद येथील कामकाज, भूसंपादन पुनर्वसन भरपाई कोर्टाची प्रकरणे, नवी मुंबईतील विविध नोडस् अंतर्गत इस्टेट विभागाच्या नोडल ऑफीस संदर्भात समन्वयक-परीक्षक, तसेच जबाबदारी दिलेल्या विभागांतर्गत प्रलंबित धोरण, कायदेमंडळात वादविवादात उपस्थित होणारे प्रश्‍न याबाबत पाठपुरावा करणे या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सह-व्यवस्थापकीय संचालक-3 कैलास शिंदे यांच्याकडे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील साडेबारा टक्के विभागाचे मुख्य भूमी-सर्व्हे अधिकारी, नवी मुंबई प्रकल्पासाठी सर्व भूसंपादन, फायनान्स, सामाजिक सेवा-पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा-पाटबंधारे प्रकल्प, विधी विभाग, पालघर नवीन शहर विकास, तसेच जबाबदारी दिलेल्या विभागांतर्गत प्रलंबित धोरण, कायदेमंडळात वादविवादात उपस्थित होणारे प्रश्‍न याबाबत पाठपुरावा करणे असे विभाग देण्यात आले आहेत. याशिवाय सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्याकडे विभागीय चौकशी, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, तक्रार निवारण कक्ष, नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका संबंधित नागरी सेवा संदर्भात समन्वय साधणे, तसेच जबाबदारी दिलेल्या विभागांतर्गत प्रलंबित धोरण, कायदेमंडळात वादविवादात उपस्थित होणारे प्रश्‍न याबाबत पाठपुरावा करणे अशा विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, सिडकोशी संबंधित सर्व विभागांची जबाबदारी सह-व्यवस्थापकीय संचालकांना आणि मुख्य दक्षता अधिकार्‍यांना दिली असली तरीही सर्वच प्रकरणे अंतिम निर्णयासाठी व्यवस्थापकीय संचालकांकडेच पाठविण्यात यावीत, असेही व्यवस्थापकीय संचालक ड़ॉ  संजय मुखर्जी यांनी सह-व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.