गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस समर्थ - पोलीस उपायुक्त शिवराज पाटील

पनवेल ः पनवेल परिसरात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी वाढीस लागल्यास सदर गुन्हेगारीचा बिमोड करण्यास पोलीस समर्थ असून नागरिकांनी न घाबरता अशा गुंडाच्या विरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी कराव्यात, असे आवाहन परिमंडळ 2 चे नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे. 

गुन्हेगारी कोणत्याही स्वरुपाची असो, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम कोणीही करू नये, आपल्यावर अन्याय होत असल्यास त्याने त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, कायदा कोणीही हातात घेवू नये. नागरिकांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करावे, कुठेही घटना घडत असल्यास त्याची तात्काळ माहिती नजिकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, गुन्हेगारी कोणत्याही परिस्थितीत पनवेल परिसरात वाढून देणार नाही, पनवेलचा विकास चोहोबाजूने होत आहे. स्थानिकांसह मोठ्या प्रमाणात बाहेरील नागरिक उद्योगधंद्यानिमित्त येथे वास्तव्यास आले आहेत. अशातूनच अनेकवेळा गुन्हे घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांशी सहकार्याची भावना ठेवावी, आपल्यावर अन्याय होत असल्यास तात्काळ त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा शिवराज पाटील यांनी केले आहे.