आवक घटल्याने दरवाढ

नवी मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यामुळे कांद्यांचे भाव दिवसेंदिवस वधारत आहेत. एपीएमसीत येणार्‍या कांद्याची आवक घटू लागल्याने कांदाचे भाव वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात हा कांदा दहा ते वीस रुपयांनी वधारणार असल्याने 50 ते 60 रुपये झाला आहे. दसरा दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठतो की काय अशी भिती व्यक्त होत आहे. 

कांदा मुसळधार पावसाने सडून गेलेला आहे. उरलेल्या कांद्यावर वर्षांचे गणित जमवणार्‍या कांदा उत्पादकांचे गणित निर्यात बंदीमुळे विस्कटलेले आहे. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपेदेखील तग धरू शकलेले नाही. कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे कांदा यंदा ग्राहकांना रडवणार असे चित्र स्पष्ट होत आहे. सर्वसाधारणपणे मुंबईच्या एपीएमसी बाजारात दीडशे ते दोनशे गाडया भरून येणारा कांदा या आठवडयात अर्ध्यावर आला असून केवळ 80 गाडयांमधून पाच हजार 645 क्विंटल कांदा घाऊक बाजारात आलेला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या महानगर प्रदेशाला कांदापुरवठा करणार्‍या तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत बुधवारी कांद्याची आवक साडेपाच हजार क्विटलपर्यंत झाल्याने कांद्याचे दर 28 ते 38 रुपये आहेत. हाच कांदा किरकोळ बाजार 50 ते 60 रुपये किलोने विकला जात आहे. आवक घटल्याने ही दरवाढ झाली असून येत्या काळात कांदा घाऊक बाजारातच साठ रुपये किलोने विकला जाण्याची शक्यता कांदा व्यापार्‍यांनी व्यक्त केली.