मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर 18125 वाहनांवर कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे केले उल्लंघन 

नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी गत सप्टेंबर महिन्यात विशेष मोहिम राबवून तब्बल 18125 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यात अतिवेगाने वाहन चालविणार्‍या तब्बल 10115 वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहन चालकांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड देखील वसुल करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस पनवेल केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी दिली.  

वाहतुकीचे नियम न पाळता वेग मर्यादेचे उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर मोठया प्रमाणात अपघात होऊन जीवीतहानी होत असल्याचे दिसून आले आहे. एक्सप्रेस मार्गावरील अपघातांचे हे प्रमाण कमी व्हावे यासाठी महामार्ग पोलिसांकडून मागील 3 वर्षापासून विशेष मोहिम राबवून वाहन चालकांचे वाहतुकिच्या नियमांबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. त्याशिवाय रस्ता सुरक्षा अभियानात विविध कार्यक्रम राबवुन वाहन चालकांमध्ये वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर देखील अनेक वाहन चालकांकडून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, मार्गिकेची शिस्त न पाळणे, द्रुतगती महामार्गावर वाहन थांबविण्यास मनाई असताना देखील वाहन थांबविणे, असे प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले होते.  

त्यामुळे महामार्ग पोलिसांच्या पळस्पे केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी व कर्मचार्‍यांनी महाराष्ट्र राज्य वाहतुक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक भुषण उपाध्याय व महामार्ग पोलीस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गत सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर विशेष मोहिमेद्वारे वाहतुकिच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई केली. या मोहिमे अंतर्गत इंटरसेफ्टर वाहनाद्वारे व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामार्फत अतिवेगाने वाहन चालविणार्‍या तब्बल 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाईल संभाषण करणे, लेन कटींग करणे, वाहनांना काळ्या काचा लावणे, रिफलेक्टर न लावता वाहन चालवणे अशा 8010 वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली.  

चौकट  

महामार्गावरील अपघात कमी व्हावेत तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुकिच्या नियमनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पळस्पे येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने नियमित वेगवेगळे प्रबोधनपर कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणार्‍या अपघाताबाबत वाहन चालकांना माहिती देण्याबरोबरच अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात येतात. त्याचप्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार्‍या दंडात्मक कारवाई बाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन देखील करण्यात येत असल्याचे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.