खंडणी उकळणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पनवेल ः करंजाडे परिसरातील बिल्डींग मटेरियल सप्लायर्स करण्याच्या वादातून फिर्यादीस पिस्तुलाचा धाक दाखवून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ करून खंडणी उकळणार्‍या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

या संदर्भात परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, आरोपी राजेश कैकाडी उर्फ राजा कैकाडी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, सरकारी नोकरांवर हल्ला, भारतीय हत्यार कायदा, गर्दी मारामारी असे 12 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशाच प्रकारे त्याने करंजाडे येथील सिद्धीगिरी प्लॉट नं.22, सेक्टर 8 या ठिकाणी जावून बिल्डींग मटेरियल सप्लायर्स करणार्‍या तक्रारदारास विरोध करून त्याच्याकडे पैशाची मागणी केली व त्याच्यावर पिस्तुल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहूल सोनावणे, सपोनि निलेश राजपूत, सपोनि जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिपक कादबाने यांच्यासह विशेष पथकाने मध्यरात्री 2 च्या सुमारास करंजाडे येथील त्याच्या घराजवळ जावून त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु त्याने विरोध करताच पोलिसांनी दरवाजा तोडण्यास सुरूवात केली. यावेळी आरोपीने दरवाजा उघडला असता पोलीस त्याला ताब्यात घेत असताना झटापटीमध्ये त्याने आरडाओरडा करून स्वतःचे डोके ग्रीलच्या खिडकीला आपटून घेतले. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून घराची झडती घेतली असता 25 हजार 200 रुपये किंमतीचे मेड इन युएसए असलेले व दोन राऊंडपैकी 1 राऊंड चेंबर लोड असलेले पिस्तुल आढळून आले आहे.