मालमत्ता कर आकारणीला ब्रेक

पनवेल : पालिका क्षेत्रात नवीन करप्रणाली लागू करण्यात आली आहे. मात्र कोरोनामुळे 2019 ते 2020 सालची नवीन मालमत्ता कर आकारणीला ब्रेक लागला आहे. पालिकेने जीआयएस मॅपिंगद्वारे फेब्रुवारीपर्यंत 90 टक्के संपूर्ण मालमत्तेचे सर्वेक्षण केले होते. मात्र, कोरोनाची साथ, अपुर्‍या मनुष्यबळामुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे. 

4 वर्षापुर्वी पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली. चार वर्षांत प्रथमच पालिका क्षेत्रात नवीन करप्रणाली लागू करत असल्याने होणार विरोध लक्षात घेता, पालिकेनेही सध्याच्या घडीला नव्या धोरणानुसार, मालमत्ता कर आकारणीचा विषय बाजूला सारला असून, केवळ कोविडवरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. पालिकेला या मालमत्ता कर आकारणीमधून वर्षाला सुमारे 180 कोटींचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. चार टप्प्यांत कर आकारणी होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा 12 मीटरपेक्षा मोठा रस्ता, दुसरा टप्पा 12 मीटरपेक्षा कमी आकाराचा रस्ता, तिसरा टप्पा दाट गावठाण तर चौथ्या टप्प्यात झोपडपट्टीचा समावेश असणार आहे. 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नगरपरीषदचा भाग, 29 महसुली गावे या व्यतिरिक्त खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदींचा समावेश आहे. आत्तापर्यंत 3 लाख 7 हजार मालमत्ताचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पालिकेच्या अंदाजानुसार एकूण मालमत्ता कराचा आकडा 3 लाख 20 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ त्यातच कोरोनाची साथ यामुळे ही प्रक्रियाच ठप्प झाली आहे. सध्या खारघरमधील काही भागांचा सर्वेक्षण अपूर्ण आहे. काळुंद्रे भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या ठिकाणी सुमारे 1,200 मालमत्ता आहेत. प्राथमिक स्तरावर पालिकेने येथील नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यास सुरुवात केली आहे. कामोठे शहराचे मालमत्ता सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या ठिकाणी सुमारे 54 हजार मालमत्ता आहेत. यानुसार, पनवेल महानगरपालिका सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्ताधारकांच्या हरकती, सूचना मागविणार आहे. सध्याच्या घडीला सिडको नोडमधून कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता कराचे उत्पन्न पालिकेला प्राप्त होत नाही. प्रथमच पालिकेमार्फत आकारल्या जाणार्‍या या करासंदर्भात सिडको नोडमधून विरोध होण्याची शक्यता आहे. 

कोट

अपुरे मनुष्यबळ, कोविडच्या साथीमुळे मालमत्ता कर नवीन प्रणालीद्वारे आकारणीस उशीर झाला आहे. टप्प्याटप्प्याने या कर आकारणीला सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काळुंद्रे येथे सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांकडून या संदर्भात हरकती मागविण्यात आल्या असून, लवकरच पालिका क्षेत्रात सर्वत्र कर आकारणीला सुरुवात केली जाईल.

- संजय शिंदे, उपायुक्त,पनवेल महानगरपालिका