टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश

मुंबई : मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांमध्ये टीआरपीला अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं टीआरपी रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. याच संदर्भात मराठीतील फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून वादात असलेला रिपब्लिकचे चालकही यात सहभागी असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ते म्हणाले, बीआरसी ही संस्था टीआरपी मोजण्याचे काम देशात करते. ही संस्था वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावते, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसांसोबत काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवरून डेटा शेअर करत असल्याचे उघड झाले आहे. हे कामगार लोकांना घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे द्यायचे. महिन्याकाठी किरकोळ रक्कम देण्याच्या आमिषावर ग्राहकांना दिवसभर किंवा दिवसातील काही ठरावीक तास ठरावीक वाहिन्या सुरू ठेवण्यासाठी तयार केले. या कृतीमुळे मिळालेल्या नोंदींआधारे अपेक्षित असलेल्या ठरावीक वाहिन्यांचे टीआरपी वाढवण्यात आले. परमबीर सिंह म्हणाले, आम्ही हंसाच्या माजी कामगाराला अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहोत. जाहिराती मिळविण्यासाठी या बनावट टीआरपीच्या आकड्यांची मदत घेतली गेली आहे. पोलिसांकडून याचा तपास केला जाणार आहे. असे आढळल्यास कारवाई करीत ही रक्कम जप्त करण्यात येईल.  तसेच टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेलला मिळालेल्या जाहीरातींही चौकशी केली जाणार आहे.


रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांना सवाल केल्यामुळे त्यांच्याकडून असे आरोप केले जात असल्याचे अर्णब यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असून देशाला सत्य माहीत असल्याचे अर्णब यावेळी म्हणाले.