शैक्षणिक शुल्कासहित इतर फीसाठी तगादा

एपीजे शाळे विरोधात पालकांमध्ये संताप ; आंदोलनाची तयारी

नवी मुंबई ः केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाउन काळात कोणत्याही शाळेने शैक्षणिक शुल्क व्यतिरिक्त कोणतीही फी पालकांकडून वसूल करू नये असे आदेश जारी केले आहेत. परंतु नेरूळ व खारघर येथील एपीजे शाळेने विद्यार्थ्यांकडून संपूर्ण फी वसूल केल्याने व पालकांकडे तगादा लावला असल्याने पालकांमध्ये संताप पसरला आहे. या बेकायदेशीर फी वसूलीविरोधात कारवाईची मागणी केली असून पालक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे कळत आहे.

कोरोना पार्श्‍वभूमीवर देशात गेले सहा महिने लॉकडाऊन असून अनलॉक पाचचा टप्पा सुरु झाला आहे. यामुळे टप्प झालेले व्यवहार पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. गेले पाच महिने सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने याचा मोठा फटका पालकांच्या उत्पन्नावर बसला त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्का व्यतिरिक्त कोणतीही शुल्क आकारू नये असे आदेश शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना दिले होते. नवी मुंबई नेरूळ व खारघर येथे एपीजे शाळेच्या शाखा असून सुमारे सात हजार विद्यार्थी येथे सीबीएससी पद्धतीचे शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण फी वसूल केली असून ज्या विद्यार्थ्यांनी ही फी भरली नाही त्यांच्यामागे फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. याबाबतची तक्रार काँग्रेस कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली असून संबंधित शाळेवर कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांकडून शाळेने फी वसूल केली आहे त्यांची फी पुढच्या टर्ममध्ये समायोजित करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे करून शाळेने फी कमी न केल्यास कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

एप्रिल ते सप्टेंबर शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन शिक्षण मिळत असताना शाळा संपूर्ण फी कशी आकारू शकते असा सवाल अनेक पालकांनी आजची मुंबईशी बोलताना व्यक्त केला आहे. लॉकडाउन काळात शाळेच्या विजेच्या पाण्याच्या  व अन्य इतर खर्चात बचत झालेली असतानाही शाळेने विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल करणे बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

दिल्लीच्या धर्तीवर कारवाई करा

 दिल्ली सरकारने एपीजे संस्था चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून त्यांच्या दिल्लीतील दोन शाळांना सील लावण्यात आले आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन न करता विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून कोरोना संक्रमण काळात अतिरिक्त फी वसूल केल्याने हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. याच धर्तीवर पालिका आयुक्तांनी याबाबतची पावले उचलावीत अशी मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.