सत्तासोपानासाठी भाईंची फिल्डींग

नवी मुंबई भाजपला खिंडार पाडण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर

नवी मुंबई ः नवी मुंबईच्या राजकारणातील भाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेश नाईकांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी ठाण्यातील राजकीय ‘भाई’ सरसावले आहेत. नाईक समर्थक नगरसेवकांना फोडण्यासाठी या भाईंनी राज्यातील नावाजलेल्या प्रसार माध्यमांतील काही प्रतिनिधींना जवळ केल्याचे कळत आहे. नाईक समर्थक नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधावे म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ माजली आहे. नवी मुंबईकर मात्र निवडणुकीत सत्तेची वरमाला  कोणत्या भाईच्या गळ्यात घालतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत आठ मे 2020 रोजी संपली आहे. आठ मे पूर्वी महापालिकेची निवडणुक होऊन सत्ता जनप्रतिनिधींच्या हाती सोपवणे गरजेचे होते. परंतु  कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने एप्रिल व मेमध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन जाहीर केल्याने या निवडणुका वेळेेत घेणे महाराष्ट्र सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा  सर्व कारभार सध्या पालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्यामार्फत हाकला जात आहे. या महापालिकेची निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा जरी राज्यकर्त्यांची असली तरी जानेवारी फेब्रुवारी पूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याचे दिसत आहे. निवडणूका लांबल्यामुळे सर्वच पक्षांना आपली राजकीय गणिते मांडणे व निवडणुकीच्या तयारीला त्यामुळे पुरेसा वेळ मिळाल्याचे दिसत आहे. राज्यात साडेतीन हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी ही राज्यातील महत्त्वाची महापालिका असून तिच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात असाव्यात असे सर्वच पक्षांना वाटते. सध्या जरी राज्य सरकार, पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोना विरूद्ध लढाईत गुंतले असले तरी नवी मुंबई महापालिकेवर आपलाच झेंडा फडकावा या दृष्टीने भाजपा नेते गणेश नाईक तसेच शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. नवी मुंबईकरांच्या संपर्कात रहावे म्हणून गणेश नाईक प्रचंड मेहनत करत असून दर सोमवारी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन स्थानिकांच्या समस्या मांडत आहेत. त्याचबरोबर वर्च्युअल मीटिंग द्वारे निराळ्या गृहनिर्माण  सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांची ते संपर्क साधत आहेत. कोणत्याही वेळी निवडणुका जाहीर झाल्या तरी त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याची मानसिकता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यात निर्माण केली आहे. याउपर शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळेल हे ठरलेले नसल्यामुळे म्हणावा तसा जनसंपर्क संबंधित पक्षांकडून होताना दिसत नाही. गेल्या निवडणुकीत हातचा विजय शिवसेनेने अंतर्गत लाथाळी, बंडाळी तसेच नेत्यांमधील असलेला बेबनावामुळे गमावला होता. बहुमतासाठी कमी पडत असलेला जादुई आकडा नाईकांनी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन गाठला आणि  महानगरपालिकेवर आपली सत्ता राखली.  परंतु गेल्या काही महिन्यात राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडल्याने व या स्थित्यंतरा नंतर नवी मुंबई महानगरपालिकेची होणारी निवडणूक ही राज्यातील पहिली निवडणूक असल्याने तिला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेश नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्याने शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते त्यांच्यावर राग धरून असून यावेळी नाईकांना धडा शिकवण्याची भाषा त्यांच्या विरोधकांकडून बोलली जात आहे.  

शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाआघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या तीनही पक्षांनी एकत्र लढवावी अशी अपेक्षा वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. परंतु तिन्ही पक्षांचा तिकीट वाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट न झाल्याने एकत्रितपणे निवडणुकीला कसे सामोरे जावे हा प्रश्‍न कार्यकर्त्यांपुढे आहे. तिकीट वाटपात तीनही पक्ष्यांची एकसूत्रता न झाल्यास शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे त्यांच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. नाईक समर्थक नगरसेवकांना आपल्या पक्षात आणण्यासाठी तिनही पक्षांकडून विविध हातखंडे अजमावले जात असून अनेक प्रकारची अमिषे दाखवली जात आहेत. नवी मुंबईतील काही पत्रकारांवर ही जबाबदारी ठाणे जिल्ह्याचे राजकीय भाई म्हणून ओळखले जाणार्‍या एका नेत्याने सोपवली असून या पत्रकारांनी तशी विनयशील फील्डिंग अनेक नगरसेवकांभोवती लावली आहे. या पत्रकारांच्या बुमच्या गळाला नाईक समर्थक नगरसेवक लागतात की नाही यावर महाआघाडीचे यश अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वेळी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही याची दखल या राजकीय भाईनी घेतली असून त्याबाबत आतापासूनच योग्य ते निर्देश आपापल्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिले आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारी दरम्यान नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यादृष्टीने राजकीय बैठकांचा सपाटा सर्वच पक्षांनी सुरू केला आहे. दरम्यान ठाण्याचे भाई नवी मुंबईतील दादांच्या राजकीय साम्राज्याला खिंडार पाडतात की नाही ते नवी मुंबईकर कोणाच्या गळ्यात माळ घालतात यावर अवलंबून राहणार आहे.

चौकट

श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणार्‍या नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात असाव्यात असे सर्वच पक्षांना वाटते. गेली 25 वर्षे नवी मुंबई पालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. सध्या कोरोना विरूद्ध लढाईत सर्वजण गुंतले असले तरी या पालिकेवर झेंडा फडकावा म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. 

पत्रकारांचा बोलबाला
1.देशात सध्या राजकीय क्षेत्रात अनेक पत्रकारांचा बोलबाला असून काही पत्रकार इच्छुक उमेदवारांना तिकीट वाटपापासून ते मंत्रिपद मिळण्यापर्यंत महत्वाची भूमिका बजावतात. 
2.प्रसार माध्यमांतील काही पत्रकारांनी  भाईंच्या सांगण्यावरून दादांच्या राजकीय साम्राज्याला सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याने नाईकांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष. 
3.ज्या प्रसार माध्यमांतील प्रतिनिधींना हे काम सोपवण्यात आले आहे ते प्रतिनिधी यापूर्वी गणेश नाईकांच्या ही जवळचे.