3 लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

नवी मुंबई ः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीमेत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेत राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या 3,16,449 कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त राज्यात सर्वाधिक चांगले काम केलेले आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणार्‍या या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने 3,35,469 कुटुंबांमधील 10,53,896 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही कामगिरी राज्यात सर्वोत्तम आहे.  

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकात  2 ते 3 करोनादूतांचा समावेश असलेली 670 पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान तसेच ऑक्सिजन पातळी तपासून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्‍वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याची माहिती शासनाच्या पमध्ये नोंदवित आहेत. 

पहिल्या टप्प्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पाही राबविला जाणार असून या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन दुसर्‍यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्यावेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. सर्व चांगल्या कामात उत्तम सहकार्य करणार्‍या नवी मुंबईकर नागरिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेलाही चांगले सहकार्य केले.