3,148 आरोपी मोकाट

693 आरोपी फरार ः गुन्हेगारी वाढण्याची भिती 

नवी मुंबई : शहरता गुन्हेगारीचा आलेख वाढता असून नवी मुंबई पोलिसांनी अद्याप गुन्हे प्रकटीकरणात अपेक्षित यश मिळविलेले नाही. विविध गुन्ह्यांतील सुमारे 3,148 आरोपी मागील वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यापैकी 693 आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे. पोलीसांच्या हाती न लागलेले गुन्हेगार अद्याप मोकाट असल्याने गुन्हेगारी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. 

 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वर्षाला साधारण सात हजार गुन्हे घडत आहेत. त्यात हत्या, खंडणी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांसह चोरी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हा घडल्यानंतर अनेकदा तातडीने कसून तपास करून गुन्ह्यांची उकल करण्यावर पोलिसांकडून जोर दिला जातो. मात्र, काही सराईत गुन्हेगार कसलाही पुरावा मागे सोडत नसल्याने ते हाती लागत नाहीत, तर काही गुन्हेगारांची ओळख पटूनही ते पोलिसांच्या हाती तुरी देऊन पोबारा करतात. अशा गुन्हेगारांचा शोध घेऊनही पोलिसांना त्यात यश न आल्याने, त्यांना पाहिजे असलेले आरोपींच्या यादीत समाविष्ट केले जाते. त्यानुसार, 2019 मध्ये तब्बल 3,148 आरोपींनी पोलिसांना चकवा दिला आहे. त्यापैकी 693 गुन्हेगारांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्यात वाशी पोलिस ठाणे हद्दीतील सर्वाधिक 364 गुन्हेगार आहेत. नव्याने घडणारे गुन्हे व जुन्या गुन्ह्यातील आरोपी यांना अटकाव घालण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. शहरात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यात राज्याबाहेरील गुन्हेगारांचाही हात असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांची दमछाक होत आहे. काही गुन्हेगारांना राज्याबाहेरून शोधून आणण्यात पोलिसांनी आपली कामगिरी दाखवून दिली आहे. लॉकडाऊननंतर नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढू लागली आहे. त्यात या पाहिजे असलेल्या अथवा फरार आरापींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.