महामार्गावरील भुयारी मार्गांचा खर्च पाण्यात

पनवेल : शासनाने पंधराशे कोटी रुपये खर्च करून सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. गरज आहे तिथे उड्डाणपुल व भुयारी मार्ग बांधले आहेत. परंतु चुकीची रचना व निकृष्ट कामांमुळे भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. तसेच ठेकेदाराकडून भुयारी मार्गाची देखभाल केली जात नसल्याने त्यात पाच फुट पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सायन-पनवेल महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. येथे वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने शासनाने या महामार्गाचे रुंदीकरण केले. या कामासाठी जवळपास 1,500 कोटी खर्च करण्यात आले. वाशी, सानपाडा, जुईनगर, उरण फाटा, तळोजा लिंक रोड, कामोठे येथे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत, तर खारघर, कामोठे, तळोजा लिंक रोड, उरणफाटा, नेरुळ या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले आहेत, परंतु भुयारी मार्गांची रचना चुकली असून, ते खूपच अरुंद झाले आहेत. बांधकाम निकृष्ट झाले असून, सर्व भुयारी मार्गांत पाणीगळती सुरू आहे. खारघरमधील मार्गात पाच फूट पाणी साचते. इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. भुयारी मार्गाचे दरवाजेही सडले आहेत.  ठेकेदाराकडून भुयारी मार्गाची देखभाल केली जात नाही. पाच वर्षांत एकदाही दुरुस्तीची कामे केली नाहीत. वास्तविक, शासनाने ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे, परंतु कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. भुयारी मार्ग बंद असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती ठेकेदार करत नसल्याने, नवी मुंबई महानगरपालिकेने नेरुळमधील भुयारी मार्गांची दुरुस्ती केली होती, परंतु तेथील मार्गांचीही दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेचा खर्चही व्यर्थ गेला आहे.