अति मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील तीन दिवस महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. 

आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्‍चिम दिशेला सरकत असून, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेला आठवडाभर राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या काळात राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.