महागाई दरात वाढ

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात आता महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये सातत्यानं होणारी वाढ पाहता सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.34 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईचा मागील आठ महिन्यांतील हा सर्वाधिक मोठा आकडा ठरत आहे. 

याआधी ऑगस्ट महिन्यात (उझख) वर आधारित महागाई दर 6.69 टक्क्यांवर होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात किरकोळ महाराई दर 3.99 टक्के इतका होता. ऑक्टोबर 2019 नंतर किरकोळ महागाई चार टक्क्यांपेक्षा अधिकच असल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात हा दर 7.59 टक्क्यांवर पोहोचला होता. परिणामी वाढत्या महागाईमुळं येत्या काळात व्याजदरात होणारी कपातीची शक्यता आता आणखी कमी झाली आहे. 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात छडज नं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात कंज्यूमर फूड प्राइस इंडेक्स 10.68 टक्के अशा दोन आकड्यांमध्ये पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हे आकडे 09.05 टक्क्यांवर होते. सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या दरात 20.73 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ऑगस्टमध्ये मात्र हे प्रमाण 11.41 टक्क्यांवर होतं. याचा अर्थ भाज्यांचे दर दुपटीनं वाढले आहेत. फळांच्या बाबतीत सांगावं तर, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फळांच्या दरांतही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अंड्यांचाही महागाई दर 15.47 टक्क्यांनी वाढला. ऑगस्टमध्ये हे दर 10.11 टक्क्यांवर होते अशी बाब समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात मांस, मासळीचे दरही ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 17.60 टक्क्यांनी वाढला. तर, डाळी आणि इतर उत्पादनांच्या किंमतीत वार्षिक तुलनेत 14.67 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. दुग्धजन्य उत्पादनांच्या किंमतीही वाढल्याचं निरिक्षणात स्पष्ट झालं. सध्याच्या घडीला किरकोळ महागाई दर रिजर्व्ह बँकेनं आखून दिलेल्या स्तराहून जास्त आहे. 9 ऑक्टोबरला क्रेडिट पॉलिसीमध्ये सप्टेंबर महिन्यातील महागाईमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ऑक्टोबर-डिसेंबर आणि जानेवारी-मार्च दरम्यान महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.