वाढत्या खोदकामामुळे रहिवाशी त्रस्त

पनवेल : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर गेली सहा-सात महिने बंद असलेली विविध कामे आता महिनाभरात सुरू झाली आहेत. परंतु या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम केले जात आहे. मात्र काम झाल्यावर रस्त्यांची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने येथील स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले असून छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत.

पनवेल परिसरातल वसाहतींमध्ये महानगर गॅसची पाइपलाइन टाकण्याकरिता ठेकेदाराकडून खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम झालेल्या जागेची व्यवस्थित डागडुजी न झाल्यामुळे कामोठेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर खोदलेल्या रस्त्यावर पावसामुळे चिखल तयार झाला आहे. यातून दुचाकीस्वार घसरून अपघात घडत आहेत. तर संध्याकाळी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. खोदलेल्या भागावर डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पनवेल आणि सिडको वसाहतींमध्ये आता पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार महानगर गॅसने बर्‍याच ठिकाणी गॅस वाहून नेणार्‍या वाहिन्या टाकल्या आहेत. त्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. पनवेलसह खारघर, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे वसाहतीमध्ये महानगरच्या गॅसवाहिन्या जमिनीखाली टाकण्यात येत आहेत. त्यासाठी सिडकोची परवानगीसुद्धा घेण्यात आली आहे. यासाठी महानगर गॅसने सिडकोकडे रस्त्याचे खोदकाम आणि तोडफोड केल्यामुळे त्याबदल्यात पैसेसुद्धा भरलेले आहेत. त्यानुसार सिडकोने खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. परंतु ते न केल्यामुळे आजच्या घडीला अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. रस्त्याबरोबर लेवलिंग न केल्यामुळे दुचाकीस्वार घसरून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. संध्याकाळी अंधारात खोदकाम केलेला रस्ता दिसत नाही; त्यामुळे वाहतूककोंडीबरोबर अपघातांत भर पडली आहे. सिडकोने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.