एनएमटीच्या 230 विद्युत बस धावणार

‘फेम 2’ अंतर्गत आणखी 100 बसचा प्रस्ताव केंद्राकडून जूर 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आणखी 100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून, एकूण बसेसची संख्या 230 होणार आहे. केंद्राच्या ‘फेम 1’ योजनेअंतर्गत सद्या 30 विद्युत बस शहरात सुरू आहेत. ‘फेम 2’ अंतर्गत अगोदर 100 बसचा प्रस्ताव मंजूर असून आता आणखी 100 बसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे एनएमएमटीला आर्थिक फायदा होणार असून शहरातील प्रदुषण टाळण्यासही मदत होणार आहे. 

केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालय यांनी इलेक्ट्रिक बसेस खरेदी बाबत प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यापूर्वी फेम 1 ही योजना राबविली होती. त्या योजनेंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने 30 बसेस घेतल्या आहेत. केंद्र शासनाच्या ‘फेम 2’ या योजनेअंतर्गत 100 बसला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहेत. करोनामुळे या बस येण्यास उशीर झाला आहे. त्या बस डिसेंबरअखेपर्यंत दाखल होतील अशी शक्यता आहे. विद्युत बस फायदेशीर ठरत असल्याने पालिकेने आणखी 100 बसचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. या पर्यावरणपूरक बस खरेदीसाठी केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान पालिकेला मिळणार आहे. नव्याने मंजूर झालेल्या 100 बसमध्ये 12 मीटर लांबीच्या 70 बसेस तर 9 मीटर लांबीच्या 30 बस मिळणार आहेत. एक 12 मीटर बसेसची अंदाजित किंमत 1 कोटी 50 लाख असून 9 मीटरच्या बसची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये असणार आहे. 12 मीटरच्या  एका बससाठी शासनाकडून 55 लाख तर 9 मीटरच्या बससाठी 40 लाखाचे अनुदान केंद्राकडून प्राप्त होणार आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बसला 1 किलोमीटरसाठी 16 रुपये लागत असून  डिझेल बससाठी  मात्र 30 रुपये प्रतिकिमी खर्च येत आहे. त्यामुळे भविष्यात शहरात जास्तीत जास्त विद्युत बस  प्राप्त झाल्याने एनएमएमटीला आर्थिक फायदा होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेला केंद्र शासनाच्या ‘फेम 2’ अंतर्गत आणखी 100 बसला मंजुरी मिळाली असून पालिकेला केंद्राचे मोठे अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी निविदा जाहीर करण्यात येत असून डिसेंबरपूर्वी कार्यादेश देण्यात येतील. शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी या बस अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे पालिका आयुक्ता अभिजीत बांगर यांनी सांगितले.