कोव्हीड केंद्राचे भाडे महिना 2 कोटी रुपये!

सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठेकेदाराची पालिकेकडे मागणी

नवी मुंबई ः  कोव्हीड संक्रमित रुग्णांना पुरेशी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेने सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात 14 कोटी रुपये खर्चून 1200 खाटांचे कोव्हीड रुग्णालय उभारले आहे. परंतु हे प्रदर्शन केंद्र सिडकोने यापूर्वी देखभाल व चालवण्यासाठी एशियन कॉन्व्हेंशन आणि एक्सपोसिशन प्रा. लिमी. या पुण्यातील खासगी कंपनीला दिले आहे. संबंधित कंपनीने भाड्यापोटी नवी मुंबई महानगर पालिकेकडे महिन्याला कमीतकमी 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

नवी मुंबईत कोरोना रुग्नांची संख्या वाढत असताना त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने ठीक ठिकाणी विलीगीकरण व अलगीकरण केंद्रे उभारली आहेत. सुरुवातीला पालिकेने पनवेल जवळील इंडिया बुल्सच्या इमारती ताब्यात घेऊन तेथे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची  सोय केली. तेथे पालिकेने स्वखर्चातून गिझर व पंख्यांची सोय करून सुरुवातीच्या काळात रुग्णांचे विलीगीकरण केले. परंतु पनवेल विलीगीकरण केंद्र खूपच दूर असल्याने नवी मुंबईतच कोरोना संक्रमितांचे विलीगीकरण करण्यासाठी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात 1200 खाटांचे विलीगीकरण केंद्र उभारले. ज्यामध्ये 400 खाटा या व्हेंटीलेटर्स सह अद्यावत सुविधांनी सज्ज केल्या आहेत. पनवेल येथील विलीगीकरण केंद्रसाठी इंडिया बुल्स ला सुमारे 7 कोटी रुपये भाड्या पोटी दिल्याचे बोलले जात आहे. 

त्याच धर्तीवर सिडको प्रदर्शन केंद्र चालवणार्‍या कंपनीने पालिकेकडे भाड्यापोटी महिना  2 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हि मागणी केली आहे. मार्च 2020 पासून पालिकेने सदर केंद्र ताब्यात घेतले असून सुरुवातीला स्थलांतरित कामगारांची सोय या केंद्रात केली होती. सिडकोने 6 मे रोजी संबंधित कंपनीला पत्र देऊन प्रदर्शन केंद्राचा ताबा महापालिकेला देण्यास सांगून संबंधित कंपनीच्या व्यवहाराची जबाबदारी पालिका घेईल असे कळवले होत. महापालिकेनं जरी या प्रदर्शन केंद्राचा ताबा घेतला असला तरी या केंद्राचे विमा, देखभाल आणि इतर कामे आपण करत असून महापालिकेलाही आपण आपली सुविधा देत असल्याचे कळविले आहे. या सुविधा खासगी संस्थांना दिल्या तर आपणाला महिन्यापोटी 13,32 कोटी रुपये मिळणार होते. परंतु महापालिकेने सादर केंद्राचा ताबा घेतल्याने आमच्या कंपनीला महिन्यापोटी निदान कमीत कमी 2 कोटी रुपये भाड्यापोटी देण्याची विनंती पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी आपले किती कामगार दररोज काम करत आहेत याची जंत्रीही सोबत दिली आहे. याशिवाय पालिकेला संबंधित भाड्यावर 18% दराने वस्तू व सेवा कर हि भरावा लागणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवर त्याचा अतिरिक्त भार पडणार आहे. जर कंपनीची वरील मागणी मान्य झाल्यास पालिकेला संबंधित कंपनीला भाड्यापोटी 16 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. 

कोणासाठी संकट तर कोणासाठी संधी

कोरोना कालावधीत लॉकडाऊन असल्याने सिडकोचे प्रदर्शन केंद्र बंदच राहणार होते व त्याचा भुर्दंड संबंधित ठेकेदाराला होणार होता. पण पालिकेने ते ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर उभारले. त्याचे भाडे ठेकेदाराने मागितल्याने पालिकेसाठी प्रदर्शन केंद्र संकट तर ठेकेदाराला संधी ठरल्याचे बोलले जात आहे.