सफाई कर्मचार्‍यांना 5 हजारांचा ‘टोल’

वसुलीसाठी कर्मचार्‍यांमागे नेत्यांचा तकादा

नवी मुंबई ः पालिकेच्या अनेक विभागात काम करणार्‍या सुमारे 6500 कामगारांना समान काम समान वेतन व किमान वेतन यातील सुमारे 70 कोटी रुपयांचा फरक नवी मुंबई महापालिकेने अदा केला आहे. हि रक्कम सफाई कर्मचार्‍यांना मिळवून देण्यासाठी अनेक कर्मचारी संघटना व विविध राजकीय पक्षांकडून नियमित आंदोलने करण्यात आली होती. या गरीब कामगारांना त्यांची थकबाकी मिळवून देण्यात मोठे यश मिळाल्या नंतर आंदोलनाशी संबंधित काही नेत्यांनी श्रमपरिहाराच्या शुल्कापोटी प्रत्येक कर्मचार्‍याच्या मागे 5 हजार रुपयांचा ‘टोल’ लावल्याची चर्चा सध्या महापालिकेत आहे.

नवी मुंबई महापालिकेत सुमारे 6500 कामगार उद्यान, विद्युत, सफाई विभाग, पाणीपुरवठा तसेच मलनिस्सारण विभागात कार्यरत आहेत. हे कामगार गेली अनेक वर्ष ‘समान काम सामान वेतन’ या तत्वावर काम करत असून त्यांना राज्य शासनाने निर्धारित केलेले ‘किमान वेतन’ द्यावे अशी मागणी या कामगारांकडून वेळोवेळी पालिकेकडे करण्यात येत होती. या मागणीसाठी अनेक आंदोलने विविध कामगार संघटना तसेच विविध  राजकीय पक्षांकडून सातत्याने करण्यात येत होती. अनेक वेळा काम बंद आंदोलन करण्यात आल्यावर तत्कालीन आयुक्तांनी या मागणीबाबत निर्णय घेऊन कामगारांना ‘समान काम समान वेतन’ व  ‘किमान वेतन’ यातील फरक देण्याचे मान्य केले. या आंदोलनमध्ये राज्यात खळखट्याकवर विश्‍वास ठेवणार्‍या एका राजकीय पक्षाने मोलाची भूमिका बजावली होती. आयुक्तांनी हि देणी देण्यासंदर्भात पालिकेच्या विविध विभागांकडून वेतन फरकाचा प्रस्ताव मागवून घेऊन त्यास सर्वसाधारण सभेची व स्थायी समितीची मान्यता जानेवारी व फेब्रुवारी मध्ये घेतली. महापालिका निवडणुकीपूर्वी कामगारांचा हा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून सत्ताधारी पक्षाने कोणतीही खळखळ न करता त्यास मंजुरी दिली. नवी मुंबई महापालिकेने संबंधित कर्मचार्‍यांना टप्प्या टप्प्याने हि थकबाकी कंत्राटदारांमार्फत दिली आहे. 

 अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी मान्य झाली व थकबाकी मिळणार म्हणून आनंदात असणार्‍या कामगारांच्या मागे वसुलीचा तकादा काही नेत्यांनी लावल्याची चर्चा सध्या महापालिकेत आहे. प्रत्येक कामगारामागे 5 हजाराचा ‘टोल’ लावल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. काही कर्मचार्‍यांनी आमदार गणेश नाईक यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यावर त्यांनी लेखी तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याचे संबंधित कामगारांनी ‘आजची नवी मुंबई’च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितल. कामगारांचे अनेक प्रश्‍न आजही प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घ्यावा पण ‘टोल’ लावू नये अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली असून टोल लावण्यासाठी अनेक विभाग पालिकेत असल्याचा टोला कामगारांनी लगावला आहे.