‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी’ दुसरा टप्पा सुरु

दररोज 75 ते 100 घरांचे उद्दिष्ट 

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीमेचा पहिला टप्पा नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ऑक्टोबरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आता 14 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणाला जबाबदारीने सुरूवात करण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्याकरिता राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या 3,16,449 कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 3,35,469 कुटुंबांचे सर्वेक्षण महानगरपालिकेच्या 670 पथकांनी व्यवस्थितरित्या पूर्ण केले आहे. यामध्ये तब्बल 3 लक्ष 35 हजार 469 कुटुंबांतील 10,53,896 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. आता दुसर्‍या टप्प्यात आधीच्या सर्वेक्षणात नोंदणी करण्यात आलेल्या कुटुंबांना ही पथके पुन्हा भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती घेऊन शासनाच्या अ‍ॅपमध्ये नोंदविणार आहेत. दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणाकरिता या पथकांना दररोज 75 ते 100 घरांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीमेचे मुख्य उद्दिष्ट कोरोनाबाधितांचा जलद शोध घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत आणणे व त्यांच्यापासून कोरोनाचा संभाव्य प्रसार टाळणे हे आहे. या मोहीमेला सुसंगत अशी कार्यवाही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेऊन सुरूवातीपासूनच राबविली असून ‘जलद रूग्णशोध (ट्रेस), त्यांची तपासणी  (टेस्ट), त्वरित उपचार (ट्रिट )’ या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष दिले. महानगरपालिका क्षेत्रात दररोज होणार्‍या सर्वेक्षणाचा वेबिनारव्दारे विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला. एखाद्या विभागात कमी सर्वेक्षण झाल्यास त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने दूर केल्या. 14 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यात हीच पथके पहिल्या टप्प्यात भेटी दिलेल्या घरांमध्ये पुन्हा जाऊन त्या नागरिकांचे सद्यस्थितीतील शारीरिक तापमान तसेच ऑक्सिजन पातळी तपासून नोंदविणार आहेत. यामधून या आधीच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या आरोग्यस्थितीची नोंदणी झालेली असल्याने त्यांच्या आरोग्य स्थितीतील फरक जाणून घेता येणार आहे. याव्दारे पहिल्या सर्वेक्षणानंतर कोणाला काही त्रास झाला आहे काय, याची माहिती मिळणार आहे व तसे कोणी आढळल्यास त्याला आवश्यक ती वैद्यकीय मदत करणे व त्याचा फॉलोअप घेणे सोयीचे होणार आहे. विविध प्रकारची माहिती देऊन पथकांमार्फत व्यापक स्वरूपात जनजागृतीही केली जात आहे. नवी मुंबईकर नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभल्यानेच शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगली कामगिरी नवी मुंबई महानगरपालिका करू शकली असून आता दुस-या टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणासाठी घरोघरी येणा-या महानगरपालिकेच्या पथकांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन  महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.