...नाहीतर बेमुदत अन्नत्याग आंदोलन

पनवेल ः महानगरगॅसची पाईप लाईन टाकण्यासाठी 11 महिन्यापासून खांदा कॉलनीतील एकूण 7535 मीटर लांबीचे रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तासाठी महानगर गॅसने सिडकोला वर्षभरापूर्वी दोन कोटी आठ लाख रुपये दिले आहेत. मात्र अद्याप पक्की दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभुमीवर सिडकोने 20 तारखेपर्यंत दखल न घेतल्यास बुधवार पासून सिडको कार्यालय नवीन पनवेल येथे परिवर्तन सामाजिक संस्थेच्यावतीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. 

खांदा कॉलनीतील खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. महानगर गॅस कनेक्शन जोडण्यासाठी रस्ते खोदले आहेत. यातील बरेचशे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सिडकोकडे पैसेही भरण्यात आले आहेत. खोदलेल्या ठिकाणी अनेकदा माती व खडी टाकून सिडकोच्या ठेकेदाराने तात्पुरती डागडुजी केली परंतु पक्के स्वरूपाचे काम केलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर छोटे छोटे दगड, माती, पावसाळा असल्याने चिखल पसरलेला आहे. यातून वाहने चालविण्यास अडचण होत असून पायी प्रवासही जिकरीचा झाला आहे. सिडकोच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना प्रचंड  त्रास होत आहे. परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्याकडे नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी आपली व्यथा मांडली असता गणेशोत्सवामध्ये 110 गोण्या टाकून खांदा कॉलनीतील खड्डे वाघमारे यांनी 30 पदाधिकार्‍यांसह बुजवले होते. मात्र अद्याप सिडकोने पक्की दुरुस्ती केलेली नाही. सिडकोने तातडीने खांदा कॉलनीतील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन डांबराने रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली परिवर्तन सामाजिक संस्थेने केली आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत दखल न घेतल्यास बुधवारपासून सिडको कार्यालय नवीन पनवेल येथे परिवर्तन सामाजिक संस्थे कडून बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली.