विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नवी मुंबई ः प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवकांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे इलठणपाडा, सुभाषनगर व परिसरात भाजपाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवी मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्‍वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला. 

माजी नगरसेवक किशोर गायकर, माजी नगरसेविका सुनिता पिंगळे, विशेष कार्यकारी अधिकारी पंढरीनाथ पाटील, माजी शाखाप्रमुख राजेश जैस्वाल, राष्ट्रवादीचे नागेश नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला. सोशल डिस्टिंन्सिंग पाळत पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात आ.नाईक यांनी या सर्वांचे स्वागत केले. या कार्यकर्त्यांचा भाजपात योग्य सन्मान राखला जाईल. माझ्या आमदारकीची अद्याप चार वर्षे बाकी असून या कालावधीत प्रभाग 2आणि 5चा कायापालट करू. पाणी, रस्ते, हॉस्पिटल सर्व काही सुविधा निर्माण करू अशी ग्वाही दिली. आगामी निवडणुकीत नवी मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नविन गवते, माजी नगरसेवक अपर्णा गवते, माजी नगरसेवक दिपा गवते, समाजसेवक राजेश गवते, वीरेश सिंह, अनिल गवते, दामोदर कोटियन,चंद्रमा सोेनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.