दोन सराईत गुन्हेगार गजाआड

नवी मुंबई ः तळोजा व तुर्भे परिसरातील मोबाईल व कपड्यांच्या दुकानात चोरी झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई युनिट एकच्या गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात दोन सराईत चोरट्यांना गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

मकबूल खान आणि जावेद शेख, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही चोरट्यांनी 16 ऑक्टोबरला तळोजा आणि कोपरखैरणे मधील मोबाईल आणि कपड्यांची दुकाने फोडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिकचे विविध सामान आणि कपडे चोरी केले होते. चोरट्यांनी हे सामान नवी मुंबईमध्ये विक्रीही केले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तुर्भे रेल्वे स्टेशनमधून दोघाही चोरट्यांना पकडले व त्यांच्याकडून चोरलेला एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेले चोरटे सराईत गुन्हेगार असून या अगोदरही त्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचे पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.