केबल चोरणारी चौकडी जेरबंद

15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; रबाळे पोलीसांची कामगिरी

नवी मुंबई ः पॉलिकॅब इंडिया लिमिटेड कंपनीची 6 एमएम केबलचे 78 रील चोरीस गेले होते. याप्रकरणी 14 ऑक्टोबर  2020 रोजी रबाळे पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा शिताफीने तपास करुन पोलीसांनी चार आरोपींना जेरबंद केले आहे. 

जियाउद्दिन मोईउद्दिन शेख (40),मोहंमद सरवर अत्तर हुसेन शेख (36),आली नसीम शेख(26),भूपेंद्र उदयलाल पटेल (29) अशी आरोपींची नावे आहेत. रबाळे येथील पॉलिकॅब इंडिया लिमिटेड कंपनीचे 6 एमएम वायरचे तीन रीलचा एक बॉक्स असे एकूण 26 बॉक्स मधील 78 रील (काळ्या लाल पिवळ्या निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या केबल) सदर चार आरोपींनी चोरले होते. याप्रकरणी 14 ऑक्टोबर 2020 रोजी रबाळे पोलीस ठाणे गु.र.न. 291/2020 भादवि 457, 380, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर घरफोडीच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. घटनास्थळावर जाऊन आजूबाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपास करुन सदर गुन्ह्या हा शिताफीने तपास करुन आरोपींना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 13 लाख 26 हजार किमतीची पॉलिकॅब केबलचे 78 रील, 2 लाख किंमतीची गुन्हा करतेवेळी वापरलेली एक काळ्या पिवळ्या रंगाची मारुती सुझुकी ,6000 रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण 15 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.